दखल न्यूज भारत नेटवर्क…
आधुनिक भारतात ज्यांनी विषमते विरूध्द समतेच्या चळवळीला सुरूवात केली व ज्यांच्या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,हे ‘आधुनिक भारतामध्ये सामाजिक चळवळीचे पितामह’ असे संबोधतात अश्या राष्ट्रपिता जोतीबा फूले यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप-खूप हार्दीक मंगल कामना!…
जोतीबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ व मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० साली झाला.
ज्योतिबा फुले हे प्रखर लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली.त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली.आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.
जोतीबा फुले यांचे मूळ गाव – कटगुण (सातारा) होते.गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव.जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.
१८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.बुद्धी अतिशय तल्लख,त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी २३ सप्टेंबर १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली.
पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून,अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
‘सर्वसाक्षी जगत्पती।त्याला नकोच मध्यस्ती॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.मराठीत मंगलाष्टके रचली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सामाजीक क्रांतीच्या चळवळीचे नेतृत्व करु पाहणार्या सेनापतीला दुरदृष्टी व धाडस या दोन मौलीक गुणाची गरज असते.हे दोन्हीही गुण ज्योतिबा फुले यांच्याकडे निश्चितच होते.
मातृत्व आलेल्या विधवा स्त्रियांना आत्महत्या न करण्यासाठी प्रवृत करीत.त्यांचे बाळंतपण व मुलांचे संगोपण त्यानी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह व बाल संगोपण गृहात करीत.
काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण स्त्रिला आत्महत्या न करु देता,तीचे बाळंतपण केले व तिच्या बाळाला-यशवंताला दत्तक घेतले.हेच फुले दांपत्याचे एकमेव मुल होते.कारण त्यांना स्वत:चे मुल नव्हते.या यशवंताला त्यानी वैद्यकीय शिक्षण दिले व त्याचे आंतरजातीय मुलीशी लग्न लाऊन दिले.
ज्योतिबा फुले यांनी विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांचा संप घडवून आणला होता.आजकाल पगारवाढीसाठी संप केला जातो.
पण अशा सामाजिक प्रश्नासाठी संपाचे शस्त्र ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल.
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –
“विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका
अविद्येने केले।।”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई.त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली.तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली.त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे.
पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत.
त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे.या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे.तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले.
त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते.२ मार्च १८८८ रोजी पुणे येथे ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी ज्योतीबाने शेतकर्याच्या पोषाखात जाऊन म्हणाले की, ‘येथे जमलेले हिरेमोती व मौल्यवान कपडे घातलेले लोक हे हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत.खरा हिंदुस्थान खेड्यात आहे.तो उपाशी,गरीब,बेघर व उघडा-नागडा आहे.त्याला शिक्षण देणे आवश्यक आहे.ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया यांना करुन द्यावी.
ज्योतीबांनी इंग्रज नोकरशाहीलाही धारेवर धरले होते.इंग्रज अधिकारी ऎषारामी बनला आहे.हाताखालील ब्राम्हण अधिकार्यावर विश्वास ठेऊन इंग्रज अधिकारी शेतकर्यांची पिळवणूक करीत असतो.
इंग्रजी राजवटीत ब्राम्हण अधिकारी अधिकच जुलमी व भ्रष्टाचारी बनली आहे.
ग्रामीण शेतकरी–कष्टकरी जनतेचे आता दुहेरी शोषण होत आहे.एकीकडे इंग्रज व दुसरीकडे ब्राम्हण यांच्याकडून त्यांची भयंकर नागवणूक होत आहे.
म्हणून ज्योतीबा फुले म्हणतात-
‘सत्ता तुझी राणीबाई। हिंदुस्तानी जागृत नाही॥
जिकडे तिकडे ब्राम्हणशाही। डोळे उघडूनी पाही॥
मुंबईच्या सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.
महामानव क्रांतीबा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी प्रणाम…



