Home देशविदेश ईश्वरभेद,धर्मभेद,जातीभेद का आणि कशासाठी?…

ईश्वरभेद,धर्मभेद,जातीभेद का आणि कशासाठी?…

          जर ईश्वर असेल तर अनेक नसून एकच आहे,हे जाहीर आहे,जगमान्य आहे.”सबका मालीक एक” असे सत्यसाईबाबा सांगून गेले.तरी त्यांचा उपदेश कुणीच मानीत नाहीत,असे का घडावे ? तेहतीस कोटी देव का मानावे ? ब्रम्हा विष्णू महेश हे त्रिदेव आणि विष्णूचे दहा अवतार का मानावे ? देवदूत म्हणजे प्रेषित मुहम्मद पैगंबराला,देवाचा पुत्र येशूला,तीर्थंकर जैन , बुध्द यांना भगवान का म्हणावे ? हेच भगवान असतील तर ओरिजनल भगवान जो आहे,आणि तो एकच आहे त्यासच भगवान अल्ला येशू का मानू नये ? मूळ देव म्हणजे निर्गुण निराकार, जो डोळ्यास दिसत नाही आणि पंचेंद्रियास जाणवत नाही इतका सूक्ष्म असलेला तोच खरा देव अशी मान्यता असतानाही मग देवाचे निर्गुण निराकार रूप न आठवता सगुण साकार रूप म्हणजे खरा देव नव्हे,यास पण मान्यता देऊनही मग मूर्तीतच ईश्वर बघण्याचा आणि त्याची पूजा करण्याचा आग्रह हट्ट का ? 

         जात : या पृथ्वीतलावर ” माणूस ” नावाची एकच जात आहे,म्हणजेच पशु आणि पक्षात जशा अनेक जाती असतात आणि यांचे अवयव सारखे नसतात,म्हणून त्यानुसार त्यांच्यात अनेक जाती पडतात,तसे तर माणसाचे नसते,साऱ्याच माणसांचे सारेच अवयव सारखेच आहेत,म्हणजे सर्वांना एकच आणि सारखेच नाक,दोनच पाय हात डोळे,एकच डोके,शरीरांतर्गत अवयव म्हणजे किडनी हृदय यकृत फुप्फुसे, नाड्या सर्वांच्या सारख्याच.असे असताना मानवजात एकच असताना मग जातीभेद का ? कशासाठी ? हा जातीभेद ईश्वरनिर्मित किंवा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे,हे पण सर्वांना मान्य असूनही मग भेदाभेद आणि भेदभाव का ? आणि त्याही कर्मानुसार नसून जन्मानुसारच का ?  

        मागच्या जन्मीचे पापपुण्य कर्मानुसार जात धर्म मिळतो ,या पाखंडी विचारास आधार प्रूफ कोणता ? कुणीही काहीही कसेही सांगितले तरी बुद्धिहीन मुर्खासारखे ते मानायचे का ? अशा गोष्टीवर विश्वास श्रद्धा ठेवणे हे शहाणपणाचे लक्षण होय का ? माणूस पशू पक्षी वनस्पती जंतू या जीवसृष्टीत इतर जीव वगळता फक्त ” माणूस ” या जीव प्रकारात च अनेक जाती नाहीत,बाकीसाऱ्याच जीवा मधे अनेक प्रकार पहावयास मिळतात.असे असतानाही माणसाच्या अनेक जाती मानाने आणि त्यातही श्रेष्ठ कनिष्ठ,उच्चनीच, पवित्र अपवित्र असा भेद करणे म्हणजे बुद्धिभेद करणेच नव्हे काय ? हा एक प्रकारचा नीचपणा हलकटपणा नव्हे काय?

       माणसामाणसात भेद करून,त्यांना स्पृश्य अस्पृश्य असा भेद करणे हे एक तर कमी बुध्दी विकृतबुद्दी चे लक्षण नाहीतर इतर जातीना कनिष्ट आणि आपल्याच जातीला वरिष्ठ असे आपणच आपल्या स्वतःस समजून इतर जातीना कनिष्ठ समजून शेखी मिरवायची,अभिमान जपायचा,जातीची अस्मिता जपायची हे सुलक्षण नसून अवलक्षणच नव्हे का ? किंवा स्वतःच्या फायद्यासाठी जाणूनबुजून केलेले हे जातीभेदाचे षडयंत्र नव्हे का ? षडयंत्र म्हणजे राजकारणच,स्वार्थी,लोभी,विकृत बुद्धीच्या माणसांनी स्वतःची सत्ता संपती प्रतिष्ठा जपण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी केलेले हे जातीचे राजकारण म्हणजे जातीभेद होय,असा निष्कर्ष का काढू नये ?

       जसे देवाचे आणि जातीचे तसेच धर्माचेपण आहे.” माणूस ” नावाची जात ,आणि ” माणुसकी ” हा त्याचा स्वभाव,आणि ” मानवता ” हा त्याचा धर्म,असे असताना ,असे न समजता अगदी त्याचे विरुद्ध विचार करणे आणि तसे वागणे म्हणजे अधर्म ” च नव्हे काय ? मानवता धर्म याचा अर्थ सत्य न्याय निती,दया क्षमा शांती,अहिंसा प्रेम या सद्गुणांची भक्ती.या विचारावर विश्वास श्रद्धा भक्ती न ठेवता ,विषमतेचे विकृत विचाराचा स्वीकार करणे ,हे माणसाचे लक्षण नसून जनावराचे लक्षणच नव्हे का ?…

        याचा अर्थ कमी बुध्दी,विकृतबुद्दीचे लक्षणच समजावे.अखिल मानवजातीने ” सर्वांचा धर्म एकच ,तो म्हणजे ” मानवधर्म “. म्हणजे समता.समारभाव.सद्गुणांचा स्वीकार आणि दुर्गुणांचा धिक्कार.असे जर मानले तर मग ख्रिश्चन मुस्लिम जैन हिंदू शीख बौद्ध यहुदी पारशी असे अनेक धर्माची गरजच काय ? 

       सर्वांची नीती एकच ती म्हणजे ” आपल्यामुळे आपल्या बुद्धीने मनाने वाणीने देहाने इतरांना दुःख देऊ नये,आणि इतरांनी दुःख दिले तर त्यास शत्रू न मानता क्षमा करावी,कुणाचे शोषण पिळवणूक करू नये,अन्याय अत्याचार करू नये, सत्याने न्यायाने वागावे,इतरांनी कुणी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला तर त्यास मारण्याच्या हेतूने नव्हे तर स्वसंरक्षणार्थ त्याचा जीव गेला तरी ते माफच आहे.या न्यायाने आपले वर्तणूक वागणे म्हणजे नीती आणि धर्म होय.

       धर्माचे आचरण म्हणजेच नैतिकतेचे आचरण आपण काहीही केले तरी त्याकृती मागची आपली भूमिका शुद्ध पवित्र असणे म्हणजेच पुण्य,आणि आपली भूमिका अशुद्ध अपवित्र विकृत म्हणजेच पाप होय.असे समजून कर्म करणे तोच खरा धर्म होय.मग अनेक धर्माची गरजच काय ? 

        आता राहिला प्रस्न संस्कृतीचा ,याचा अर्थ मी काय खावे ? कोणता पोशाख वापरावा ? देव मानावा का नाही ? मानला तर त्याची आराधना पद्धत काय असावी ? मी सगुण ईश्वर मानू की निर्गुण? कशात मला समाधान शांती मिळेल? ती खरीच मिळते का?…

        देव धर्म जात या मानवनिर्मित संकल्पनांची चिकित्सा करण्याचा माझा मानवी हक्क मला असला पाहिजे,हा आग्रह.आणि या सर्व संस्कृतीचे स्वातंत्र्य,विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जे मला संविधानाने दिले आहे,ते मला मिळायला पाहिजे.असा आग्रह म्हणजेच मानवी मूल्यांचा आग्रह आणि मानविहक्कांचा आग्रह धरणे ,हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि कर्तव्य पण आहे.

      असे समजून या लोकशाहीने यास मान्यता दिली तर अनेक धर्माची किंवा अजून एखादा नवीन धर्म काढण्याची गरजच उरणार नाही.उलट मानवी हक्काचा जाहीरनामा ,जो युनो नि मान्य केला,त्याची खरीखुरी जगभर जर अंमलबजावणी झाली ,तर सर्वच धर्माचे विसर्जन करायला हरकत नसावी. 

       बहुधर्माचे धोरण स्वीकारल्या मुळे अखिल मानव जातीचा फायदा तर नाहीच उलट नुकसानच झाल्याचा इतिहास आहे.कारण देशादेशातील अनेक लढाया मध्ये जेव्हढे सैनिक जनता मारल्यागेली त्यापेक्षा दुप्पट तिप्पट जीवितहानी या बहुधर्म ” या जागतिक धोरणामुळे झाली.

       याचा अर्थ धर्म हा माणसाचा जीव वाचविण्यासाठी निर्माण झाले,पण प्रत्यक्षात मात्र धर्म म्हणजे माणसांचे जीव घेणारे साधन झाले.अजूनही धर्माचे संघर्ष चालूच आहेत.नव्हे उलट ते अधिकच तीव्र होत आहेत,आता तर धर्म हा राजकारण्यांच्या हातचे खेळणे आणि शस्त्र पण झाले आहेत.

        यामुळे मांजर जसे उंदरांना खाण्यासाठी त्यासोबत खेळून खेळून त्याची मजा घेऊन मग त्यास मारते.मारल्या नंतर पण उंदराच्या प्रेतासोबत पण खेळण्याची मजा लुटत त्यास फाडून खाते.असेच राजकारण आणि राजकारणी धर्माशी खेळत आहेत.यात हकनाक आम् जनतेचे जीव जात आहेत.

        बिचारे निष्पाप जीव जात आहेत.म्हणून आता काळाची गरज ही आहे की,अनेक धर्माचे धोरण नाकारून केवळ एकच धर्माचे धोरण स्वीकारले पाहिजे,ते म्हणजे ” मानवता धर्म.” जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांनी सांगितला.जो समुद्रासारखा व्यापक विशाल सर्व नद्यांना सामाउन घेणारा,सर्व नद्यांच्या पाण्याला एकजीव करणारा,असा तो सागरधर्म म्हणजेच मानवता धर्म होय.तोच सानेगुरूजींचा खरा धर्म,म्हणजे प्रेम.

       सर्व माणसावर आणि पशू पक्षी वनस्पतीवर सारखेच प्रेम करा.तरच प्रदूषण होणार नाही.सारे वातावरण परिस्थिती प्रदूषित होणार नाही.म्हणून साऱ्या धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता तर तो म्हणजे मानवता धर्म होय.सर्वांचाच सर्वासाठीचा हितकारी अहिंसक धर्म होय.जीवघेणारा नव्हे तर जीव वाचवणारा धर्म होय.

       म्हणून आजचे चिंतन फारच महत्वाचे आहे.ते म्हणजे ईश्वरभेद,धर्मभेद,जातीभेद, हे का ? कशासाठी.? यावर आपणही सकारात्मक विचार करावा.असे मी माझ्या सर्व प्रिय अप्रिय वाचकाना विनंती करतो.

  लेखक :- दत्ताभाऊ तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड..

दिनांक : 7 एप्रिल 2025. फोन : 9420912209.