शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
महाबोधी महाविहार समन्वय समिती चिमूर तालुक्याच्या वतीने प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती कार्यक्रम चिमूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबोधी महाविहार समन्वय समिती चिमूर तालुका अध्यक्ष विलास राऊत होते.प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत हरी मेश्राम,महेंद्र लोखंडे ,एसबीआय चिमूर शाखा व्यवस्थापक धम्मपाल नरवाडे,लेखक सुरेश डांगे आदी उपस्थित होते.
तथागत भगवान गौतम बुद्ध,प्रियदर्शी सम्राट अशोक,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रसिद्ध लेखक प्रा.मा.म.देशमुख यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून व प्रा. मा.म. देशमुख आणि डॉ.प्रेमकुमार खोब्रागडे यांना मौन श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिमूर शहरामध्ये पहिल्यांदाच चक्रवर्ती अशोक सम्राट यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले आंबेडकरी विचारवंत हरी मेश्राम यांनी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्यावर विस्तृत अशी माहिती दिली.
सम्राट अशोकाचे राज्य लोककल्याणकारी राज्य होते.त्यांनी आपल्या राजवटीत ८४ हजार बुद्ध विहारांची निर्मिती केली. अनेक दवाखाने बांधले. हजारो किलोमीटर रस्त्यांची निर्मिती केली. अतिशय शांतता प्रिय आणि आणि प्रेमळ असं सम्राट अशोक यांच राज्य होतं परंतु तत्कालीन इतिहासकारांनी सम्राट अशोकांना क्रूर राज्यकर्ता ठरवलं.
मात्र इंग्रज संशोधकांनी सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचा अभ्यास करून सम्राट अशोक कसे समाजाभिमुख राजे होते. त्यांनी लोककल्याणाच्या योजना कशा पद्धतीने आखल्या आणि आपल्या धर्मासोबतच इतर धर्माचा सुद्धा आपण आदर राखला पाहिजे अशी भावना सम्राट अशोकांची होती. हे सर्व इंग्रज संशोधकांनी शिलालेखाच्या माध्यमातून समोर आणले.
ज्या सम्राट अशोकांनी संपूर्ण भारतात नव्हे तर अफगाणिस्तानपर्यंत आपला साम्राज्य विस्तार केला त्याच सम्राट अशोकांनी कलिंगाच्या युद्धानंतर त्यांच्यात अमुलाग्र मत परिवर्तन झाले आणि त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आपल्या महिंद्र आणि संघमित्रा या मुलांना श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी पाठवले.
सम्राट अशोकांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवान बुद्धांच्या प्रेम,करुणा,दया, शांती या मार्गावर चालत आपला राज्यकारभार केला. सम्राट अशोकांच्या या राज्यकारभाराच्या अनेक बाबींचा भारत देशाने स्वीकार केला. त्यांनी कोरलेले अशोक चिन्ह भारत देशाने आपल्या राष्ट्रध्वजावर स्वीकारले.
चार सिंहाची प्रतिमा सारनाथच्या स्तूपावरून सरकारने स्वीकारली. एवढे सारे असताना आज मात्र सम्राट अशोकांना देश विसरला.त्यांचे कर्तृत्व देश विसरून गेला त्यामुळे प्रियदर्शनी सम्राट अशोकांचं लोककल्याणकारी राज्य कसं साऱ्या जनतेच्या हितासाठी होतं हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही, ही खेदाची बाब आहे.चिमूर सारख्या शहरात सम्राट अशोकांची जयंती साजरी करून सम्राट अशोकांचा विचार, त्यांचे कार्य जनमाणसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य नक्कीच होईल असा आशावाद हरी मेश्राम यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महेंद्र लोखंडे, सुरेश डांगे,धम्मपाल नरवाडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात विलास राऊत यांनी चिमूर तालुक्यातील सर्व बुद्ध विहारांना एका समन्वयात बांधण्याचा विचार बोलून दाखवला.सम्राट अशोकांच्या कार्याची जाणीव ठेवून आपल्याला हे कार्य करायचे आहे असे सुतोवाच त्यांनी केले.
याप्रसंगी निलेश्वर कोसे, महेंद्र बारसागडे, प्रियानंद गेडाम, प्रशांत देठे,मनोज राऊत, प्रकाश मेश्राम,आतिष राऊत आदींचा सत्कार बुद्धगया समन्वय समितीतर्फे करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले प्रास्ताविक महेंद्र बारसागडे यांनी केले.आभार प्रियानंद गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाला चिमूर तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लुंबिनी बुद्ध विहार, तक्षशिला बुद्ध विहार, संबोधि बुद्ध विहार, संविधान सन्मान सोहळा समिती वडाळा (पै), धम्मंजली महिला मंडळ आदींनी सहकार्य केले.



