Home Maharashtra डॉ.अनंता राऊत सर मैत्र विचारांचे….! — आमचे मित्र नांदेडचे प्रा.डॉ.अनंत राऊत...

डॉ.अनंता राऊत सर मैत्र विचारांचे….! — आमचे मित्र नांदेडचे प्रा.डॉ.अनंत राऊत आज निवृत्त होत आहेत त्यानिमित्त…

         समाजात वावरताना माणूस लहानपणापासून अनेकांच्या संपर्कात येत असतो.शालेय जीवनापासून सुरू झालेला त्याचा हा संपर्कप्रवास पुढे आयुष्यभर चालू असतो. शालेय जीवनात काही सवंगडी मिळतात.

         पुढे कॉलेजजीवन वाट्याला आलेच; तर तिथेही काही मित्र-मैत्रिणी भेटतात. शिक्षणानंतर नोकरी-व्यवसायानिमित्त जीवनात स्थिरावताना काही लोकांशी संबंध येतो. अशा वेळी काही लोक केवळ व्यवसायबंधू वा सहकारी म्हणूनच कायम राहतात.

         त्यापैकी काहींशी मात्र आपल्या आवडीनिवडी जुळतात आणि मैत्र बहरू लागते. सहवासाने, संपर्काने भेटीगाठींनी ही मैत्री वाढत जाते. मात्र याही पलीकडची एक मैत्री असते ती म्हणजे ‘माझिया विचारांचा मज भेटो कोणी’ अशा स्वरूपाची विचारमैत्री. या विचारमैत्रीसाठी भेटीगाठींची, सततच्या संपर्काची आवश्यकता नसते; तर विचारांचे धागे फक्त जुळावे लागतात. विचार करणाऱ्या माणसांना असे वैचारिक मित्र लाभत जातात. अशी मैत्री मग वयाच्या, लिंगाच्या, जातीपातीच्या, भौगोलिक अंतराच्या पार जाते..

        अशा मैत्रीत विचारांची देवाण-घेवाण सुरू होते.फारशी देवाण-घेवाण झाली नाही, तरी विचारांचा हा समांतर सहप्रवास मैत्री टिकून ठेवण्यासाठी पुरेस असतो. 

       महाविद्यालयीन जीवनात फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासल्यानंतर एक पुरोगामी जीवनदृष्टी प्राप्त झाली. पुढे प्राध्यापक झाल्यानंतर या जीवनदृष्टीला अनेकानेक संदर्भांची जोड मिळत गेली. या संदर्भांमधूनच खरं तर पुढे महाराष्ट्रभर सहविचारी मित्र मिळत गेले.डॉ.अनंत राऊत अशाच मित्रांपैकी एक. फारसा संपर्क नाही, फारशा भेटीगाठी नाहीत, फारसे संभाषणही नाही; पण विचारांची दिशा एकच असल्याने ही दूरस्थ मैत्री टिकून आहे.

        १९६०-७० नंतर महाराष्ट्रात अनेक विद्यालये आणि महाविद्यालये निघाली.यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे सामाजिक सहभागातून उदयाला आलेल्या या महाविद्यालयांना शासनाने अनुदान सुरू केले. त्यामुळे ७०-८० च्या दशकात तालुका, जिल्हास्तरावर उच्च शिक्षणाच्या सोई उपलब्ध झाल्या. अनेक ग्रामीण तरुण शिकून अनेक आस्थापनांमध्ये कार्यरत झाले.

        ‘शेतकऱ्यांची मुले शिकून प्रशासनात सत्तास्थानी यावीत, बहुजनांमधून शिक्षक तयार व्हावेत.’ हे महात्मा फुले यांचे स्वप्न साकार होण्याचीच जणू ही वेळ होती. असा आभास काही काळ निर्माण झाला होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये; नंतर मात्र साराच भ्रमनिरास झाला. बहुजनांच्या शिकलेल्या लोकांनी शिक्षणाकडे,त्याच्या गुणवत्तेकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. जे शिकले व सत्तास्थानी गेले त्यांनी राजकीय नेत्यांचे अनुकरण करत स्वतःच्या तुंबड्या भरण्याला प्राधान्य दिले..

         सदसदविवेकबुद्धीला, साध्यसाधनविवेकाला मूठमाती देत या लोकांचा प्रवास चालू झाला.एकेकाळी समाजात शिक्षकाला असणारा मान त्याच्याच वर्तनाने हळूहळू धुळीस मिळाला. 

         बदलत्या काळाबरोबर सामाजिक मूल्ये बदलत गेल्याने व प्रतिष्ठेचे निकष केवळ सत्ता-संपत्तीशी निगडित झाल्याने सत्ता आणि संपत्तीसमोर विद्वत्ता दिनवाणी ठरली.साहजिकच बहुजनांमधून शिक्षक-प्राध्यापक झालेल्या लोकांना सत्ता-संपत्तीचेच आकर्षण वाटू लागले.

           माणसाच्या सांपत्तिक स्थितीवरून प्रतिष्ठेचे मोजमाप होऊ लागल्याने संपत्तीच्या स्रोतांना – मग ते भ्रष्ट असले तरी – प्रतिष्ठा लाभली. आजही एखाद्या गावात प्राध्यापकापेक्षा साध्या पी.एस.आय.चे अधिक आकर्षण असते. हे उदाहरण यासाठी पुरेसे ठरावे.आजही अनेकांना प्रशासकीय सेवेत जायचे असते ते जनतेची सेवा करण्यासाठी की माया जमवण्यासाठी याचे उत्तर सामाजिकांना चांगलेच ठाऊक असते. 

        अशा स्थितीत मग बहुजनांमधील हे शिकले, सवरलेले लोक आपल्या समाजासाठी काही काम करण्याऐवजी संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागतात.कोणी प्लॉटिंगचा व्यवसाय करतात तर कोणी शेअर मार्केटिंगमध्ये जीव रमवतात.अर्थात काही अपवाद असतात,नाही असे नाही.  

अनंत राऊत असे अपवादात्मक प्राध्यापक आहेत. 

        आपण निवडलेला पेशा हा जाणकारीने निवडलेला आहे; किंवा त्या पेशाला आपण पूर्णपणे न्याय द्यायला हवा,या भूमिकेतून अध्यापन करताना त्यांचा एक जीवनदृष्टिकोन तयार झाल्यानंतर आणि समाजआकलन सिद्ध झाल्यानंतर त्यांनी लेखणी हाती घेतलेली दिसते. 

        त्यामुळेच प्राध्यापक झाल्यानंतर एपीआयसाठीच्या लेखणीपेक्षा ही लेखणी वेगळी ठरली.एपीआयसाठीची लेखणी आणि तिचे लेखन सर्वज्ञात असल्याने त्याविषयी सविस्तर लिहून शब्दापव्यय करण्यात अर्थ नाही. आपण सर्व ते जाणतोच.  

        अनंत राऊत यांची एकंदर ग्रंथसंपदा बघता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की त्यांना काहीतरी समजलेले आहे काहीतरी उमगलेले आहे आणि जे समजलेले आहे ते लोकांना सांगण्याची तळमळ त्यांच्या ठायी आहे. 

        जे समजले आहे ते निव्वळ काहीतरी नसून आजच्या लोकशाही संवर्धनासाठी आवश्यक असणारे ‘संविधानाचे मर्म’ आहे.प्रा.अनंत राऊत खरे तर मराठीचे प्राध्यापक.मराठीच्या प्राध्यापकाचा आणि संविधानाचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या इतर विषयाच्या प्राध्यापकांना त्यांना नक्कीच सामोरे जावे लागले असणार.याचे कारण म्हणजे आपण चाकोऱ्या आखून घेतलेल्या आहेत. संविधान हा राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाचा विषय,बजेट हा अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाचा विषय; तर मराठीदिन हा मराठीच्या प्राध्यापकाचा विषय. 

         खरे तर एकदा प्राध्यापक झाल्यानंतर त्याला हे कोणतेच विषय वर्ज्य नसावेत.राऊतांनी अशीच भूमिका घेतलेली दिसते. 

मराठी साहित्याच्या इतिहासाचा नीट अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या ठाई आपल्या समाजाच्या परिवर्तनाचा आणि त्यासाठीच्या वैचारिकतेचा एक आलेख आपोआपच निर्माण होत जातो.संवेदनशील माणसाला हा आलेख स्वस्त बसू देत नाही.

          एकोणिसाव्या शतकात आपल्या समाजाचा आधुनिक युगात झालेला प्रवेश,या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेली स्वातंत्र्याची चळवळ,या चळवळीला समांतर असणाऱ्या सामाजिक चळवळी आणि नंतर आपल्याला मिळालेले ‘स्वातंत्र्य आणि संविधान’ या सगळ्यांच्या अभ्यासातून त्याचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक परिपक्व होत जाते. स्वातंत्र्यानंतरच्या आजच्या काळात समाजाला नेमकी कशाची आवश्यकता आहे, ती या व्यक्तिमत्त्वाला बरोबर उमगते. मराठी साहित्याचे अध्यापन करणाऱ्या अनेक प्राध्यापकांची अशी अनेक व्यक्तिमत्त्वे स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्याला दिसतात. अशा प्राध्यापकांच्या मांदियाळीतील राऊत हे एक प्राध्यापक आहेत.

         समाजाचे जागरण करण्यासाठी त्यांनी लेखणी हाती घेतली आहे. ‘हजारो वर्षे धर्मग्रंथांना अनुसरून होणारी आपल्या समाजाची सामाजिक-सांस्कृतिक वाटचाल संविधानोत्तर काळात संविधानातील तत्त्वांना अनुषंगून व्हायला हवी.’ हे ‘विवेकमर्म’ गवसल्यानंतर त्यांनी हे मर्म समाजमनात रुजवण्यासाठीच आपले आयुष्य वेचलेले दिसते. त्यासाठी महात्मा फुले यांचा आदर्श समोर ठेवत त्यांनी साहित्यलेखनाबरोबरच सामाजिक चळवळी सुरू करण्याची वाटही चोखाळलेली दिसते.त्यांनी लेखक म्हणून मिरवण्यासाठी नव्हे तर प्रबोधनासाठी लेखन केले आहे. त्यांच्या ग्रंथांची शीर्षके बघितली तरी याचा सहजी प्रत्यय येतो.

        त्यांनी स्थापन केलेला ‘युवा प्रबोधन मंच’ आणि त्या मंचाच्यावतीने सतत आयोजित केलेले ‘संविधान जागराचे कार्यक्रम’ त्यांच्यातील प्रबोधनाची तळमळ स्पष्ट करणारे आहेत. एरवी ‘आपण भले आणि आपले कॉलेज भले’ असा विचार करत कोणत्याच सामाजिक, राजकीय विषयावर व्यक्त न होणाऱ्या; कोणत्याच भूमिका न घेणाऱ्या प्राध्यापकांच्या पार्श्वभूमीवर राऊतांचे हे भूमिकार्त वागणे नक्कीच महत्त्वाचे आणि दखलपात्र ठरते. 

राऊतांसारख्या स्पष्टवक्त्या, ठाम वैचारिक भूमिका असणाऱ्या व समाजाचे सतत भले करण्यासाठी झटू पाहणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचवेळा समकालीन समाज स्वीकारत नाही.

        पायापुरते पाहणाऱ्या भारतीय लोकांना दूरवरचे दिसत नाही.दूरगामी लाभ दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना आपले नेतृत्व कोणा हाती सोपवावे हेही समजत नाही.त्यामुळेच ‘जसे लोक तसे देव’ त्यांना भेटत जातात.उच्च विद्याविभूषितांची अभ्यासमंडळेही यापासून दूर नाहीत.राऊतांनीही या बाबीचा अनुभव घेतला आहे. 

          त्यांच्या ‘विषजंजाळ’ या कादंबरीतून लोकशाहीतील लोकांच्या अंगी असणाऱ्या या वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन आपल्याला घडते. आपण आपला नेता कशासाठी निवडतो, त्याचे नेमके काय काम, त्याने कोणते कार्य करायला हवे,हेच न उमगल्याने लोक व्यक्तिगत हितसंबंध,जातपात लक्षात घेऊन त्याची निवड करतात. त्यामुळे चांगली माणसे व्यवस्थेबाहेर कशी फेकली जातात ते राऊतांनी दाखवून दिले आहे. मात्र जीवनात असेही काही कटू अनुभव आले म्हणून ते थांबले नाहीत, निराश झाले नाहीत. 

       आपले ध्येय यापेक्षा अधिक मोठे असल्याची जाणीव असल्याने त्यांनी मराठी समीक्षेच्या क्षेत्रात नव्या ‘संविधानवादी साहित्य सिद्धांता’ची मांडणी केली आहे. ही मांडणी एकूणच साठोत्तरी चळवळींची उलटतपासणी करणारी ठरली आहे आणि म्हणूनच ती अधिक महत्त्वाची आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

        ‘संविधानवादी साहित्य : सिद्धांत आणि दिशा’ या आपल्या मीमांसाग्रंथातून अनंत राऊत यांनी आजवरच्या मध्ययुगीन आणि अर्वाचीन साहित्यमीमांसेचा धांडोळा घेत वर्तमान साहित्याच्या मीमांसेसाठी एक वेगळा आणि नवीन सिद्धांत मांडला आहे. त्यांनी मांडलेला हा ‘संविधानवादी साहित्य सिद्धांत’ आजच्या समीक्षकांना आणि एकूण विचारवंताना नवी दृष्टी देणारा आहे.संविधानात नमूद केलेल्या मानवी आचरणविषयक मूल्यांच्या दृष्टीने आजवरच्या साहित्याचे परिशिलन केले असता काय चित्र दिसते व काय दिसायला हवे याचे सिद्धांतन म्हणजे प्रस्तुतचा ग्रंथ होय. 

        संविधानवादी साहित्य सिद्धांताचे प्रयोजन विशद करताना राऊत यांनी संस्कृत, पाश्चात्त्य आणि मराठी प्रयोजन विचारांमधील अधिकउण्याची चर्चा करत संतुलित प्रयोजन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘खुराडे तोडणे’, ‘डबकी फोडणे’, ‘मनःक्रांतीसाठी’, ‘संविधाननिष्ठ राष्ट्रभावाची रुजवण’, ‘संविधानसत्याचा वाङ्मयीन आविष्कार’, ‘संविधानध्येयी जीवनदृष्टीतून भारतीयांच्या मानसिक गुंताड्याचा आविष्कार’, ‘सांस्कृतिक वर्तनस्वभावात विधायक बदल घडवणे’, ‘मानव्यनिष्ठ मूल्यबीजांची पेरणी’, ‘संविधानवादी साहित्य चळवळीची निर्मिती’ आणि ‘संपूर्ण जीवनच सुंदर व आनंदमय बनवणे’ अशी आपल्या संविधानवादी साहित्य सिद्धांताची प्रयोजने त्यांनी नमूद केली आहेत.

          संविधानवादी साहित्य सिद्धांतनाची मांडणी करताना राऊत आजवरच्या साहित्यिकांची ‘पुराणगुंगे साहित्यिक’, ‘कल्पितात रमणारे साहित्यिक’, ‘लघु जीवनदृष्टीचे साहित्यिक’, ‘मध्यम जीवनदृष्टीचे साहित्यिक’, ‘विशाल जीवनदृष्टीचे साहित्यिक’ अशी वर्गवारी करतात; व या सर्वांच्या जीवनदृष्टीत संविधानवादी जीवनदृष्टीचा कसा अभाव आहे ते अधोरेखित करतात.हे अधोरेखन करत असताना उपस्थित होऊ शकणारे काही संभाव्य प्रश्न लक्षात घेत त्यांचीही चर्चा त्यांनी केली आहे.त्याचबरोबर मराठीतील दलित, ग्रामीण आदी साहित्यप्रवाहांची संविधानवादी चिकित्साही त्यांनी केली आहे.

        आपल्या सिद्धांताची मांडणी करताना राऊतांनी ‘सिद्धांत म्हणजे काय’ ते सांगून भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान विशद करत संविधानवादाचे स्वरूप स्पष्ट केले आहे.समाजाची व साहित्यिकांची जीवनदृष्टी कशी घडते याचा शोध घेताना ते माणसाच्या संस्कृतीकरणाची प्रक्रिया उलगडून दाखवतात. 

         इथे त्यांनी समस्त समाजाकडून पारंपरिक संस्कृतीकरणाऐवजी संविधानकेंद्री संस्कृतीकरणाची अपेक्षा व्यक्त केली आहे.  

आपल्या ग्रंथात संविधानवादी साहित्य सिद्धांताचा गोषवारा मांडताना त्यांनी संविधानवादी साहित्याच्या विषय-आशयात्मक दिशा स्पष्ट केल्या आहेत.संविधानवादी साहित्याच्या मूल्यमापनाच्या निकषांची चर्चा करताना त्यांनी आजवरच्या साहित्य मूल्यमापनविषयक कलावादी व जीवनवादी भूमिकांची चिकित्सा करून संविधानवादी साहित्याच्या मूल्यमापनाचे निकष दिले आहेत. 

         युग संकल्पनेचे स्वरूप, संविधान युग,संविधानयुगीन मूल्यदृष्टी आदी बाबींची चर्चा करत संविधानयुगातील मराठी साहित्याची मूल्यमय चिकित्सा कशा पद्धतीने करता येईल,याची मांडणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे वाङ्मयेतिहास लेखनाच्या संविधानवादी दृष्टिकोनाचे स्वरूप स्पष्ट करत या दृष्टिकोनातून त्यांनी अभिजनांच्या साहित्याची त्याचप्रमाणे ग्रामीण व दलित साहित्याची मूल्यमय चिकित्सा केली आहे.या चिकित्सेतून त्यांनी संविधानवादी साहित्य सिद्धांताच्या उपयोजनाने हाती येणारे प्रस्तुत साहित्याचे वेगळे आकलन मांडले आहे. 

         अनंत राऊत यांनी अनेक संदर्भांनिशी केलेली ही पुरोगामी मांडणी मराठी साहित्यविचाराला व विचारविश्वाला कालसुसंगत दुरुस्त करत नक्कीच पुढे घेऊन जाणारी आहे.

       मित्रवर्य राऊत आता नियत वयोमानानुसार प्राध्यापक पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांना आता समाजप्रबोधनासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. या कार्यासाठी त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभावे ही सदिच्छा! 

     सुधाकर शेलार,अहिल्यानगर मित्रवर्य डॉ.सुधाकरराव आणि माझे सहकारी मित्र डॉ.बालाजी पोतुलवार यांचे मनःपूर्वक आभार!.