दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :– ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव २८ ते ३१ जुलै दरम्यान भक्तिभावात व अतिशय उत्साहात संपन्न झाला. चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात वैदिक पूजाविधी, पारंपरिक मिरवणूक, विविध धार्मिक अनुष्ठाने व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली. सायंकाळी सर्व देवतांची मिरवणूक आणि ग्रामप्रदक्षिणा मोठ्या जल्लोषात पार पडली. मांडव सजावट, फुलांची आरास आणि ढोल-ताशांच्या गजरात वातावरण धार्मिक रंगात न्हालं होतं.
दुसऱ्या दिवशी प्रायश्चित्त संकल्प, गणपती पूजन, अरणीमंथन, नवग्रह हवन, जलाधिवास यांसारख्या वैदिक विधी पार पडले. तिसऱ्या दिवशी अभिषेक, धान्याधिवास, दीपोत्सव यांसारखे विधी करण्यात आले. भाविकांनी सामूहिकरित्या या पूजाविधींमध्ये सहभाग नोंदवला.
सर्वात महत्त्वाच्या चौथ्या दिवशी सकाळी १० वाजता श्री कालभैरवनाथ महाराज यांची प्राणप्रतिष्ठा विधिपूर्वक पार पडली. नंतर बलिदान, कलशारोहण, महाआरती व पूर्णाहुती यांचे आयोजन करण्यात आले. दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या संपूर्ण कालावधीत मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. यासोहळ्याला युवकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील म्हणाले, “गावाचे ग्रामदैवत पुनः प्रतिष्ठापित करून मोठा पुण्यसंचय झाला आहे. हा सोहळा गावासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरला आहे.”
संकेत वाघमारे यांनी सांगितले की, “हा महोत्सव गावातील एकात्मता, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक ठरला असून पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणास्थान ठरेल.”



