ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण एम. हे रुजू झाल्यापासून महसूल संहितेच्या कलम १५५ अंतर्गत त्यांच्याकडे दाखल प्रकरणांत सूनावणी घेऊन नियमोचित आदेश पारित न करता नाव दुरुस्ती, कमी – जास्त फेरफार, लेखनातील तांत्रिक चूक दुरुस्ती अशा प्रकरणात खातेदारांना अपील दाखल करण्याचा सूचना देवून आपली कायदेशीर जबाबदारी झटकून खातेदारांना नाहक पायपीट करायला भाग पाडत आहेत. त्यामुळे खातेदारांना नाहक त्रास होत असून त्यांची विभागीय चौकशी करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
काॅ. अमोल मारकवार यांनी महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या बेजबाबदार कार्यपध्दतीमुळे विशेषतः वयोवृद्ध आणि अशिक्षित खातेदार शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरेल अशी बेजबाबदार कार्यपध्दती अनुसरणारे उपविभागीय अधिकारी अरुण एम.यांची विभागीय चौकशी होवू त्यांचेवर नियमोचित कार्यवाही होण्यासाठी तातडीने आदेश चौकशीचे आदेश देवून गरजू खातेदार शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणीही त्यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.

