नागार्जुन हे एक श्रेष्ठ तत्ववेत्ते होते.
जगात आजवर होऊन गेलेल्या अत्यंत महान अशा तत्ववेत्या मध्ये त्यांची गणना होते.
अध्यात्मिकता,तार्किक कुशाग्रता आणी आत्मिक मर्मदृष्टी या बाबींचा विचार केला तर भारतात त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी विचारवन्त झालेला नाही.पौरात्य जगातील त्यांचा प्रभाव ऐतिहासिक स्वरूपाचा होता.आणि या प्रभावाची व्याप्ती व खोली इतकी होती की,फक्त गौतम बुद्धाचा प्रभावच या पेक्षा जास्त असल्याचे आढळतो.
खरे तर चीन जपान व तिबेट मधील धर्मनिष्ठ बौद्धांच्या मते नागार्जुन हे धर्म चक्राचे पुन्हा एकदा प्रवर्तन करनारे त्या काळातील द्वितीय बुद्धच होते. इ.स.पू. 100 आणि इ.स. 100 या दरम्यान बौद्ध धर्माला एक नवा बहर आलेला दिसतो.
या काळात काही जुन्या आणि मूलभूत कल्पना पुन्हा एकदा ठासून मांडण्यात आल्या. इतर काही कल्पनांचे नव्याने विवरण करण्यात आले.
त्यांचे स्पष्टीकरण करण्यात आले. आणि सविस्तर मांडणी करण्यात आली.
तसेच काही नव्या संकल्पना विकसित झाल्या आणि ध्यानाची तंत्रे,पूजेचे प्रकार आणि या सर्वांशी सुसंगत अशी एक जीवन पद्धती निर्माण झाली आणि विकास पावली.
काळाच्या ओघात या गोष्टी संपूर्ण भारतभर पसरल्या.
मध्य आशिया, चीन,कोरिया जपान आणि तिबेट या दूरवरच्या प्रदेशातूनही त्यांचा प्रसार झाला आणि त्या तेथील लोकांच्या अस्तित्वाचा एक भाग बनून गेल्या. या प्रकारच्या धार्मिक श्रद्धा आणि आचार यांचे पालन करणाऱ्या लोकांनी या धर्मपंथास महायान(महान मार्ग अथवा महान वाहन) असे नाव दिले.
महायान ही गौतम बुद्धांच्या उपदेशांची एक पुनर्मांडणी आणि एक नवी सर्जनशील संश्लेषण पद्धती होती.
महायान पंथाला परिपुर्ण बनविण्याच्या आणि त्याला तत्वज्ञानाची एक बैठक देण्याच्या बाबतीत नागार्जुनांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली.
त्यामुळे महायान पंथाच्या लंकावतार सूत्रा सारख्या धर्म ग्रँथांनी त्यांचे वर्णन निःशंकपणे पुढील शब्दात केले आहे.
“ज्याच्या पेक्षा अधिक उच्च असा दुसरा मार्ग नाही असा महान मार्ग,या स्वरूपात गौतम बुद्धाच्या उपदेशाचे या जगात विवरण करणारा तेजस्वी आणि सुविख्यात भिक्षू” ते महायान पंथाच्या दृष्टीने “मानस पिता” बनले.
ज्याने सर्वांच्या निर्वाणासाठी महायान पंथाला बौद्ध संघातून काढून बाहेरच्या जगात आणले असे म्हटले जाते, तो भावी बुद्ध (बोधिसत्व) बनले.



