अखेर आळंदीत खांदेपालट नाही… — भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा किरण येळवंडे यांची वर्णी….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे विभागीय 

आळंदी : गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे आळंदी शहराध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आज पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी पुन्हा एकदा विद्यमान शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आळंदी भाजप शहराध्यक्षपदी वर्णी लावली आहे.

           विद्यमान शहराध्यक्ष किरण येळवंडे यांची शहराध्यक्षपदाची मुदत उलटून जवळपास एक वर्ष होऊन गेलेला आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण याची चर्चा शहरात गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी यांच्यासह इतर काही जण इच्छुक होते. अखेर भाजपकडून येळवंडे यांना पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदाची महत्त्वाचे जबाबदारी देण्यात आलेली आहे.

         किरण येळवंडे हे अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून अनेक समाजोपयोगी काम केलेले आहे. २०१६ च्या निवडणुकीमध्ये आळंदी नगरपरिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला, नंतर ते भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले. त्यांच सामाजिक व पक्षीय कार्य पाहून तत्कालीन तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी त्यांच्यवर आळंदी भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. 

          “पक्षाकडून मला पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली याचा आनंद आहे. आगामी आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता मिळवून देऊ, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकू. यासाठी सर्वांच्या समन्वयातून उत्तम पक्ष संघटन तयार केले जाईल. मला ही संधी दिल्याबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, विधानसभा प्रचार प्रमुख अतुल देशमुख व तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांचे आभार मानतो”.

किरण येळवंडे, शहराध्यक्ष – आळंदी भाजप