Home सांस्कृतिक माउलींच्या पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात मंगल प्रवेश, नातेपुते मध्ये माऊली विसावली…

माउलींच्या पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात मंगल प्रवेश, नातेपुते मध्ये माऊली विसावली…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

नातुपूते : आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या कैवल्यमूर्ती संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने बुधवारी सोलापूर जिल्ह्यात उत्साहात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील बरड मुक्कामानंतर सकाळी ६.३० वाजता पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली. पहाटे श्री ज्ञानेश्वर संस्थानचे पालखीप्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांच्या हस्ते माउलींची विधीवत पूजा आणि आरती पार पडली.

       सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे पालखी पोहोचल्यावर मोठ्या जल्लोषात आणि हरिनामाच्या जयघोषात तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो भाविकांनी धर्मपुरी येथे माउलीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

        पंढरीची वाट चालणाऱ्या या वारीत भक्तीमय वातावरणात टाळ, मृदुंगाच्या गजरात दिंड्यादिंड्यातून अभंगांचे गजर सुरू होते. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास साधुबुवांच्या ओढ्याजवळ सोहळा पोहोचला. रथातून पालखी उतरवून भक्तांनी खांद्यावर घेतली आणि जयघोषात ती साधुबुवांच्या मंदिरात नेण्यात आली. तेथे माउलींच्या पादुकांचे पूजन व आरती झाल्यानंतर भाविकांनी न्याहारीचा लाभ घेतला.

       सकाळी दहा वाजता सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला आणि दुपारी बारा वाजता धर्मपुरी बंगला येथे पोहोचला. येथे नैवेद्य, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले हजारो वारकरी शिंगणापूर फाट्यापाशी पुन्हा सोहळ्यात सहभागी झाले.

       सायंकाळी नातेपुते गावात ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने माउलींचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता पालखी तळावर पोहोचून समाज आरतीनंतर सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला.

         उद्या गुरुवार १ जुलै रोजी माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथील पुरंदावडे येथे पार पडणार आहे. रिंगणासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. रिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचणार आहे.