ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये ‘विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४’ (क्र. ३३) या नावाने नुकतेच एक विधेयक ठेवले आहे. त्याचे उद्दिष्ट जाहिर करतांना महाराष्ट्र शासनाने असे जाहिर केले आहे की, महाराष्ट्रामध्ये शहरी भागात पसरलेल्या शहरी नक्षलवादी (अर्बन नक्सल्स) संघटनांना नेस्तनाबुत करण्यासाठी हा नविन कायदा प्रस्तावित आहे.
सदर विधेयकाला विरोध नोंदविण्यासाठी आज संपुर्ण राज्यात आंदोलन होत आहे. त्यानुसार आम्ही आमच्या जिल्हयात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कामगार संघटना व जागृत नागरिक एकत्रितपणे हया विधेयकाचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करित आहोत. हया विधेयकातील तरतुदी पाहता हया कायदयाचा आणि नक्षलवादी संघटनांचा बिमोड हयाचा काहीही संबंध नाही, हे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. कारण हया विधेयकामध्ये नक्षलवादी अथवा शहरी नक्षलवादी हा शब्ददेखील नाही. आणि त्याची व्याख्या तर दुरच परंतू हया विधेयकामध्ये फक्त बेकायदेशीर कृत्य आणि ते करणाऱ्या बेकायदेशीर संघटना एवढेच शब्द वापरण्यात आलेले असून त्यांची अत्यंत व्यापक व मोघम अशी व्याख्या केलेली आहे. वास्तविकता बेकायदेशीर कृत्याला आळा घालण्याकरिता आपल्या देशात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कायदा १९६७ हा अस्तित्वात आहे व त्यामध्ये वेळोवेळी केंद्र सरकारने सुधारणा केलेल्या आहेत व त्या कायदया अंतर्गत व्यक्ती किंवा संघटनांना बेकायदेशीर
संघटना घोषित करून त्यानुसार व्यक्तीना अटक करण्याची व त्याविरूद्ध अभियोजन चालविण्याचे अधिकार राज्य सरकारला देखील आहेत. असे असतांना हया नविन विशेष जनसुरक्षा कायदयाची कोणतीही आवश्यकता नाही. केवळ जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व अन्यायाविरूद्ध संघटित होऊन प्रतिकार करण्याचा अधिकार संपुष्टात आणण्यासाठी राज्य शासनाद्वारे याचा वापर होणार आहे.
या विधेयकाद्वारे स्वतंत्र पत्रकार व माध्यम संस्था हयांना लक्ष केले जाऊ शकते. तसेच राजकिय पक्ष व संघटना, सामाजिक संघटना, कामगार संघटना यांच्या न्याय्य आंदोलनावर निर्बंध येण्याची दाट शक्यता आहे. प्रचलित सत्तेच्या विरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढणाऱ्या सर्व समाजघटकांना नियंत्रित करून एकप्रकारे लोकशाहीची कबर खोदण्याचे काम राज्य सरकार करित आहे. सरकारची ही कृती म्हणजे राज्यातील जनतेच्या संवैधानिक अधिकारावरील हल्ला असल्यामुळे जनभावना लक्षात घेऊन सदर विधेयक त्वरित मागे घेऊन पुर्णतः रद्द करावे.याकरिता निवेदन देण्यात आले.
यावेळी महेश कोपुलवार, अमोल मारकवार, रोहिदास राऊत, राज बनसोड, देवराव चवले, धर्मानंद मेश्राम, हंसराज उंदिरवाडे, चुन्नीलाल मोटघरे उपस्थित होते.



