Home सांस्कृतिक जगद्गुरु संत तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यातील इंदापूर येथील डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा…

जगद्गुरु संत तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यातील इंदापूर येथील डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा…

बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी.. 

     इंदापूर तालुका येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. 

      माऊली… तुकाराम… ज्ञानदेव माउली तुकाराम… अशा जयघोषात आणि टाळ मुदंगांच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत डोळ्यांचं पारणं फेडणारा गोल रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

पालखी आगमनानंतर…

      इंदापुरात तुकोबांच्या नावाचा जयघोष करीत पालखी विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळ्यासाठी आणण्यात आली. नगरखाना आगमनानंतर पालखीचे मैदानात स्वागत झाले.

       तुकाराम महाराज पादुकाच्या पूजनानंतर रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव.. तुकाराम…’ च्या गजरात प्रथम झेंडेकरी विणेकरी टाळकरी यांनी रिंगण पूर्ण केले.

         नंतर अश्वाने रिंगण पूर्ण केले. हा सोहळा भाविकांच्या लक्ष लक्ष नेत्रांनी टिपला. भक्तजनांचे डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याने सर्वत्र आनंदमय वातावरण तयार झाले. यामुळे सर्व क्षीण निघून गेला. सर्वत्र भक्तांनी फुगडया, खेळ, मनोरे उभारून आनंद व्यक्त केला.

       रिंगण सोहळ्याचे नियोजन पालखी विश्वस्तांनी केले, तर सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी केले. पालखी आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या होत्या. दरम्यान, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अमोल उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखालील मूकबधिर विद्याथ्यांची दिही भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.

        निमगाव केतकीच्या पानमळ्यातून इंदापूरच्या मालोजीराजे भोसले यांच्या पावनभूमीत तसेच ऊस मळ्यात इंदापूर मुक्कामासाठी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

       यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ‘कर्मयोगी’चे उपाध्यक्ष भरत शहा, राजवर्धन पाटील, बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पंचायत समिती गट विकास अधिकारी बांधकाम विभाग अधिकारी महावितरण विभाग अधिकारी सर्व महसूल अधिकारी सह सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.