जाधवराव यांच्यासारखी माणसे समाजकारण व राजकारणातून विरळ होत चालली आहेत : नितीन गडकरी

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : सगळीकडे मला एक चानस हवा यासाठी कोणत्याही विचाराची तडजोड करणारे अवतीभवती दिसत आहेत.लोकशाहीचा आदर्शवाद, मुल्ये जपणारे राजकारणी लोकांच्या लक्षात राहतात. परंतु, सध्या विचार बदलले असून विचार शून्यता बोकाळली आहे. दादासाहेब जाधवराव यांच्यासारखी माणसे समाजकारण व राजकारणातून विरळ होत चालली आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दादासाहेब जाधवराव यांचा वाढदिवसाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपा उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार संजय जगताप, राहुल कुल, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दीपक पायगुडे, बापूसाहेब पठारे, अशोक टेकवडे, विजय काळे, राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते विजय कोलते, उद्योजक विठ्ठल कामत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पश्‍चिम महाराष्ट्र भाजप अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, बबूसाहेब माहूरकर, भाजपचे तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, माणिकराव झेंडे, दिलीप यादव, शांमकांत भिंताडे, गणेशकाका जगताप, नीरा मार्केट कमिटीचे सभापती शरद जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप, संगिता काळे, गुलाबतात्या झेंडे, अमित झेंडे, अविनाश झेंडे, ऋषिकेश जाधवराव, गुलाब घिसरे आदींसह विविध पक्ष, संस्था, संघटना यांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित राहिल्यामुळे सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते.

पुरंदर हवेली विधानसभा भाजपाचे प्रमुख बाबाराजे जाधवराव म्हणाले की, माझ्या वडिलांनी राजकीय जीवनामध्ये निश्‍चितपणाने कोणती मोठी प्रॉपर्टी कमवली नाही. परंतु अनेक माणसे घडवण्याचे व जोडण्याचे काम केले राजकीय जीवनामध्ये अनेकवेळा मला संधी मिळाल्या असत्या परंतु वडिलांनी सांगितल्यानंतर त्यांचा शब्द अंतिम मानून प्रत्येक वेळेस थांबण्याचे काम मी केले असल्याचे त्यांनी नमूद केले. जाधवराव यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन बाबाराजे जाधवराव मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी तर ज्ञानेश्‍वर बाठे यांनी आभार मानले.

दादासाहेब जाधवराव यांचा आदर्श घ्यावा

माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांनी राजकारण पैसा कमविण्याचे साधन नसून गोरगरीब लोकांची सेवा करण्याचे व्यासपीठ मानून आयुष्यभर शोषित, पीडित, दलित लोकांमध्ये राहून जनतेचे प्रेम व विश्‍वास संपादन केला. आपल्या विचाराशी प्रामाणिक राहून प्रवाहाविरुद्ध राहून सत्तेचा विचार न करता भ्रष्टाचार मुक्‍त राजकारण व समाजकारण करणारे दादासाहेब जाधवराव यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वच पक्षांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शिवतारेंची उडवली खिल्ली

दादासाहेब जाधवरावांनी पुरंदर तालुक्‍याचा विकास करण्याचे काम केले यामध्ये अनेक रस्ते दादा जाधवराव यांनी केले त्या रस्त्यांना फक्त रंगरंगोटी करण्याचे काम विजय शिवतरे यांनी केली असल्याची खिल्ली माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी उडवली.