‘खिलाडियों के सन्मान में, राष्ट्रवादी मैदान में’, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या… — पिं.चि.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथे ब्रिजभूषण यांचा निषेध…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : भाजपचे ब्रिजभूषण सिंह यांना त्वरित अटक झालीच पाहिजे. ‘खिलाडियों के सन्मान में, राष्ट्रवादी मैदान में’, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंना झालेल्या मारहाण व अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

         पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन झाले. या वेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी उपस्थित होत्या. 

     शहराध्यक्ष कविता आल्हाट म्हणाल्या की, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात सात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानंतर कुस्तीपटूंनी गेल्या २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. नव्या संसद भवनासमोर महिलांची ‘खाप पंचायत’ करण्याची घोषणा कुस्तीपटूंनी केल्याने पोलिसांनी कुस्तीपटूंवर कारवाई केली, यात बजरंग पुनिया, विनेश फोगाट व साक्षी मलिक यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. 

       एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत असताना दुसरीकडे भारतीय महिला कुस्तीपटू आपल्या न्यायहक्कांसाठी आंदोलन करीत होते. परंतु यांना संसद भवनाचे उद्घाटन करण्यातच जास्त रस दिसत होता. हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे खेळाडू जेव्हा देशासाठी पदक जिंकतात, तिरंगा अंगाखांद्यावर घेऊन भावुक होतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावतात, तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. घडलेले दृश्य मान शरमेने झुकवणारे आणि अंतर्मुख होऊन पाहायला लावणारे आहे. लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल होते की काय, असे वाटायला लागले. खेळाडूंच्या आंदोलनानंतर व कालच्या या घटनेनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने ब्रिजभूषण सिंग यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा नाही तर क्रीडा संघटनेच्या वतीने व शहराच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.