Home उपक्रम महसूल प्रशासनामार्फत लोकहिताचे उपक्रम सुरू… — लाभ घेण्याचे तहसीलदार यांचे आवाहन…

महसूल प्रशासनामार्फत लोकहिताचे उपक्रम सुरू… — लाभ घेण्याचे तहसीलदार यांचे आवाहन…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी – तालुक्यातील महसूल प्रशासनामार्फत लोकहिताचे विविध उपक्रम सुरू असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाचे परिपत्रक क्र.एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६ अन्वये “लक्ष्मी मुक्ती” योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ च्या उताऱ्यावर स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्याकरीता स्वेच्छेने विनंती केल्यास त्याच्या कायदेशीर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून ७/१२ उताऱ्यावर नोंदविण्याची प्रक्रीया सुरू आहे. तरी ईच्छुकांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करून सहहिस्सेदार म्हणून स्वतःच्या पत्नीचे नाव नोंदवुन घ्यावे.

        शासन निर्णय दिनांक ०१/०८/२०२५ अन्वये शासकीय जमिनीवरील दिनांक ०१ जानेवारी, २०११ पुर्वीचे निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमणे नियमित करणे तसेच शासनाच्या इतर विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या, वापरात नसलेले पांदण रस्ते अथवा गावांतर्गत रस्ते तसेच, रस्त्यांच्या सिमेमधील रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी / विकासासाठी भविष्यात न लागणाऱ्या जमिनीवरील सार्वजनिक रस्त्यांचे हक्क निरसित करून घरकुलासाठीची अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने कार्यपध्दती निश्चित करून दिलेली असून त्यानुसार दिनांक ०१ जानेवारी, २०११ पुर्वीचे निवासी प्रयोजनार्थ ज्यांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे अशा व्यक्तींनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज, दिनांक ०१/०१/२०११ पुर्वीचे अतिकमणाचे पुरावे व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करून अतिक्रमणे नियमानुकूल करून घ्यावे.

       जिवंत ७/१२ मोहिम व्यापक स्वरूपात सुरू असून सदर मोहिमेअंतर्गत ७/१२ उताऱ्यावरून मय्यतांचे नाव कमी करून वारसांचे नाव दर्ज करण्याची कार्यवाही सुरू आहे. तरी ७/१२ उताऱ्यावरील ज्यांचे नातेवाईक मय्यत आहेत त्यांनी वारस फेरफाराचे अर्ज, मय्यताचे मृत्यू प्रमाणपत्र व वारसान प्रमाणपत्र घेऊन संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेशी संपर्क साधून स्वतःचा ७/१२ जिवंत करून घ्यावा.

       चालु खरीप हंगाम सन २०२५-२६ करीता दिनांक ०१ ऑगष्ट, २०२५ ते १५ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी सुरू असून सदर कालावधीत सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांच्या लाभाकरीता अत्यंत आवश्यक असलेली स्वतःची ई-पिक पाहणी पूर्ण करून घ्यावी.

       तसेच मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून ज्यांचे १८ वर्ष वय पूर्ण झाले आहे अशा व्यक्तींनी, नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याकरीता संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेशी संपर्क साधुन वयाचा पुरावा, आधारकार्ड व अद्यावत फोटो जोडून नमुना-६ चा फार्म भरून द्यावा. मतदार म्हणून नोंद असलेले कुटूंबातील व्यक्ती मय्यत किंवा कायमचे स्थलांतरीत असल्यास मृत्यूचा दाखला/आवश्यक पुरावे जोडून नमुना-७ चा फार्म द्यावा. तसेच एखाद्या मतदाराच्या नाव/पत्ता/फोटो/जन्मतारीख वय/लिंग यामध्ये काही चुका असल्यास आवश्यक पुराव्यांसह नमुना-८ चा फार्म भरून द्यावा व आवश्यक दुरूस्ती करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार आरमोरी यांनी केलेले आहे.