दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग चढत असताना भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदीच्या विकासाचा ठाम संकल्प व्यक्त केला आहे. विविध प्रभागांतील संवादयात्रेमध्ये बोलताना “संतनगरीचा विकास हा आमचा राजकीय अजेंडा नसून सामाजिक बांधिलकी आहे.
वारकरी आणि स्थानिक नागरिकांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटेल अशी आळंदी उभारू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. कुऱ्हाडे यांच्या पदयात्रा, सभा आणि घर-घर संवाद मोहीमेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शहरात निवडणुकीचा ताप वाढलेला जाणवतो. अनेक ठिकाणी महिलांनी, युवकांनी आणि व्यापारी वर्गाने त्यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मक मत व्यक्त केल्याचे चित्र दिसले.
विकासाचा रोडमॅप स्पष्ट : वाहतूक–स्वच्छता–वारकरी सुविधा केंद्रस्थानी असणार प्रभाग क्रमांक ६ मधील पदयात्रेमध्ये कुऱ्हाडे यांनी शहरातील प्रमुख प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली.
आळंदी शहराला नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा करणार, वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय यात्राकाळातील प्रदक्षिणा मार्ग आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र ‘ट्रॅफिक प्लॅन’, सांडपाणी व्यवस्थेचे अद्ययावतीकरण, इंद्रायणी नदी प्रदूषणावर नियंत्रण, आरोग्य व स्वच्छता यावर विशेष भर असणार, वारकऱ्यांसाठी सुविधा पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, तात्पुरत्या निवासव्यवस्था आणि मेडिकल हेल्प पॉईंट. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वाढीव जाळे आणि रात्रीच्या सुरक्षेसाठी खास पथके. तरुणांसाठी रोजगारसंधी कौशल्यविकास केंद्रे आणि स्थानिक उद्योगांशी समन्वय साधून रोजगारनिर्मिती करणार आहे.
कुऱ्हाडे म्हणाले,“आळंदीने धार्मिक वारसा जपताना आधुनिकतेकडेही वाटचाल करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सहभागातूनच शहराचा विकासाचा वेग वाढेल.”
नागरिकांकडून प्रतिसाद, राजकीय वर्तुळात चर्चा…
प्रभागवार भेटीत नागरिकांनी मांडलेल्या समस्या—पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन—यावर कुऱ्हाडे यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. व्यापारी, महिला बचतगट आणि युवकांशी झालेल्या संवादातून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसले. दरम्यान, स्थानिक राजकीय चर्चांतही भाजपच्या विकास आराखड्याला मिळणारा प्रतिसाद निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतो अशी चर्चा सुरू आहे.



