शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- आपल्या जीवाची पर्वा न करता पुरात वाहून गेलेल्या नागरिकांना वाचविणाऱ्या खातोडा येथील दशरथ चौखे यांना,”वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने,त्यांच्या जिगरबाज कार्यासाठी शहिद बालाजी रायपुरकर वीरता पुरस्कार जाहीर केला आहे.
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि १००० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
२६ जुलैला चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पुराचे स्वरूप आले होते.या पुरामुळे अनेक नागरिक पुरात अडकले होते.वडसी येथील शेखर गोंडाणे आणि खातोडा येथील प्रदीप रहाटे उमा नदीच्या गोंदेडा गावाजवळ असलेल्या पुलाच्या पाण्याची तीव्रता लक्षात न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
पुरात वाहून जाताना त्यांना एक झाड मिळाल्याने ते त्या झाडावर चढले.पूर बघण्यासाठी गोंदेडा येथील काही लोक घराच्या छतावर चढल्यानंतर त्यांना हे दोघे झाडावर बसलेले दिसले.गावातील पोलीस पाटलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने अनेकांची हिम्मत झाली नाही.
अशात खातोडा येथील दशरथ चौखे यांनी मोठया हिंमतीने आपल्या जीवाची पर्वा न करता दोर नदीत फेकला. त्या दोराच्या साहाय्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुरात वाहून गेलेल्या दोघांनाही बाहेर काढले.दशरथ चौखे या जिगरबाज व्यक्तीच्या हिंमतीमुळे त्या दोघांचे प्राण वाचले.
माणुसकीला जपत दशरथ चौखे यांनी केलेल्या कार्याला सलाम करण्यासाठी वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने चिमूर क्रांतीभूमीतील या वीरपुत्राला शहिद बालाजी रायपुरकर वीरता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील,सचिव सुरेश डांगे यांनी कळविले आहे.



