ऋषी सहारे
संपादक
आजाद समाज पार्टी, गडचिरोली
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार, तपासण्या व नोंदणीसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय हा गोर-गरीब, आदिवासी, शेतकरी, मजूर व सामान्य जनतेच्या आरोग्यावर थेट घाला आहे. गडचिरोलीसारख्या मागास व आदिवासी बहुल जिल्ह्यात हा निर्णय अधिक अन्यायकारक असून आजाद समाज पार्टी या जनविरोधी धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध करते.
आरोग्य हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असून शासनाने मोफत आरोग्य सेवा देणे ही त्याची जबाबदारी आहे. मात्र शासन आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढत गरीब रुग्णांकडून पैसे वसूल करण्याचा घाट घालत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
सरकार जर कोणतीही मागणी नसताना काही योजनांअंतर्गत हजारो कोटी रुपये खर्च करू शकते, तर सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी निधी उपलब्ध का करू शकत नाही? असा थेट सवाल आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी उपस्थित केला आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण व आदिवासी रुग्ण उपचारापासून वंचित राहतील. वेळेवर उपचार न मिळाल्याने गंभीर परिणाम होतील खासगी रुग्णालयांकडे जाण्याची सक्ती होईल सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा वाढेल आजाद समाज पार्टी शासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देते की, हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा.
अन्यथा, येत्या काळात आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांना घेराव घालण्यात येईल. पालकमंत्री किंवा सहपालकमंत्री गडचिरोली दौऱ्यावर आल्यास त्यांच्या ताफ्याला शांततामय मार्गाने अडवून निषेध व्यक्त करण्यात येईल.
हा लढा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून सामान्य जनतेच्या आरोग्य हक्कासाठी आहे. शासन जर जनतेच्या जीवाशी खेळत असेल तर आजाद समाज पार्टी कुठल्याही परिस्थितीत शांत बसणार नाही, असा ठाम इशारा देण्यात आला असल्याचे समजते.



