Home देशविदेश माझे हक्क आणि माझी अस्मिता…

माझे हक्क आणि माझी अस्मिता…

हक्काचे तीन प्रकार १.जिवंत राहण्याचा हक्क २.जीवन जगण्याचा हक्क ३.अस्मितेचा हक्क.

    केवळ माणसाचाच नव्हे तर या पृथ्वीतलावर जेवढे जीव प्रकार आहेत ते म्हणजे सरपटणारे प्राणी, जनावर, पक्षी, आणि मानव जात या सर्वांनाच जिवंत राहण्याचा हक्क आणि अधिकार आहे, जीवन जगण्याचा हक्क आहे, आणि तोही अस्मितेसहीत जीवन जगण्याचा हक्क आहे, हा विचार मानव जातीने मान्य करणे म्हणजेच मानवता होय, मानवतेच्या विचारावर निष्ठा श्रद्धा मान्यता आस्था म्हणजेच मानवता धर्म होय.

       जीवन जगण्याचा हक्क याचा अर्थ प्राथमिक गरजा सुख सोयीच्या गरजा आणि चैनीच्या गरजा प्राप्त करण्याचा हक्क.

    अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्या मूलभूत पाच गरजा या जिवंत राहण्यासाठी आहेत, कौटुंबिक सुविधा आणि नागरी सुविधा या माणसाच्या गरजा आहेत, या गरजा माणसाला सुख देण्यासाठी किंवा सुख मिळविण्यासाठी आहेत, त्रासदायक जीवन जगणे आणि सुखमय जीवन जगणे यात फरक आहे, सुखी जीवन जगण्यासाठी सुख देणाऱ्या गरजांची पण पूर्तता झाली पाहिजे, यासाठी सुख देणाऱ्या गरजा मिळवण्यासाठी माणसाने प्रयत्न करणे हे माणसाचे कर्तव्यच ठरते. अरे तो त्याचा हक्क पण आहे. आणि सुखी जीवनासोबत आनंदी जीवन जगणे हा सुद्धा माणसाचा हक्कच आहे, आनंदी जीवनासाठी चैनीच्या गरजा पण माणसाला आवश्यक आहेत, परंतु चैनीच्या गरजा मिळवण्यासाठी किंवा त्या पूर्ततेसाठी इतर माणसांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे सुद्धा माणसाचे कर्तव्यच असते, कर्तव्याचे पालन न करता हक्क मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ते माणसाच्या किंवा मानवी प्रवृत्तीच्या विरोधी आहे. हक्क आणि कर्तव्य हे एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, म्हणजेच हक्क आणि कर्तव्य हे मानवी जीवनाचे दोन अंग आहेत. याचा माणसाला विसर पडता कामा नये, आणि याचा विसर जेव्हा माणसाला पडतो तेव्हा मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्या सोडविणे कठीण जाते.

    प्राथमिक गरजा, सुख सोयीच्या गरजा, चैनीच्या गरजा. यातील पहिली गरजे जिवंत राहण्यासाठी आणि दुसरी गरजे सुख मिळवण्यासाठी आणि तिसरी गरज ही आनंद मिळवण्यासाठी आहे. आणि आनंद काळापासून यासाठीच माणूस धडपडत आहे प्रयत्नात आहे प्रयत्नशील आहे, गर्जापुरती होणे त्या करून घेणे त्या मिळवणे हा माणसांनी आपला एक हक्क म्हणून, सर्वांनीच एकत्र येऊन सर्वमान्य प्राप्त अशी गोष्ट बनविलेली आहे, म्हणून जीवन जगणे हा एक हक्क आहे.

     जीवन जगणे हा एक हक्क आहे असा सर्व मानव जातीने मान्य केलेला तो हक्क जरी असला तरी, तो अस्मिते सहित जीवन जगणे, हा एक वेगळाच प्रकार आहे. अस्मिते सहित जीवन जगणे आणि अस्मिता रहित जीवन जगणे, म्हणजे अस्मिता हीन जीवन जगणे यात मूलभूत फरक आहे, तोहा की, अस्मिता विरहित जीवन जगणे म्हणजे गुलामीचे जीवन जगणे होय. माणसाला जरी जिवंत राहण्याचा आणि जीवन जगण्याचा हक्क मिळाला, म्हणजेच अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि सुखसोईच्या गरजा आणि चैनीच्या गरजा त्याला मिळू लागल्या, परंतु त्या जर त्याला अस्मितेसहित मिळत नसतील तर, ती एक प्रकारची गुलामीच आहे, म्हणजेच गुलामीचे जगणे होय, पिंजऱ्यातील पोपटाप्रमाणे. पिंजऱ्यातील पोपटाच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात परंतु मुख्य एक गरज ती म्हणजे स्वातंत्र्याची, स्वातंत्र्याची गरज म्हणजेच स्वाभिमानाची गरज, अस्मितेची गरज, स्वातंत्र्याची गरज म्हणजे जन्मसिद्ध हक्काची गरज तीच न पुरविता बाकी सगळ्या सुख सुविचार आणि चैनीच्या गरजा पूर्तता होऊन त्याचा उपयोग काय? याचा अर्थ तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण केल्या परंतु तुम्हाला स्वातंत्र्यच नाही दिले तर त्या ते जीवन म्हणजे गुलामीचे जीवन होय. पारतंत्र्यातील जीवन होय, हुकूमशाही व्यवस्थेतील जीवन होय,

     माणसाचे स्वातंत्र्य आणि माणसाच्या गरजा या मूलभूत हक्कात जर समाविष्ट केल्या तर, हे हक्क कुणी कुणाला द्यावे हा प्रश्न पडतो, मानव जातीतील सर्वच माणसाने जर आम्हाला जीवन जगण्याचा जिवंत राहण्याचा आणि अस्मितेसह जिवंत राहण्याचा अधिकार आहे, हक्क आहे असा ठराव पास जरी केला तरी, हुकूमशाही व्यवस्थेमध्ये, म्हणजेच सत्ताही हुकूमशाच्या हातात जर असेल तर, हा हक्क मिळणे शक्य नाही, तसेच लोकशाहीचे सरकार जरी असले तरी, ते सरकार हुकूमशाही विचाराचे असेल तर, जिवंत राहण्याचा किंवा जीवन जगण्याचा आणि तेही अस्मितेने जीवन जगण्याचा हक्क ते सरकार देणार नाही, म्हणून आम्हीच केलेला हक्काचा हा कायदा अमलात येण्यासाठी आपणच एकत्र येऊन संघटीत होऊन संघर्ष केला पाहिजे, संघर्ष करून जीवन जगण्याचा हक्क आणि अस्मितेचा हक्क जर आपणास मिळत नसेल तर, आपल्या हक्काचे आणि अधिकाराचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी ज्या सरकारवर आहे तेच सरकार आपणास बदलावे लागेल, कारण या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीची राज्यघटना आहे परंतु त्या राज्यघटनेची किंवा संविधानाची अंमलबजावणी करणारे सरकार जर नसेल तर, ते सरकार उलथून पडण्याचा अधिकार जनतेला आहे, परंतु जनताच जर गुलाम असेल लाचार असेल पराधीन असेल, जनताच जर आपले हक्क आणि कर्तव्य विसरलेली असेल तर मग फार कठीण आहे, अशा परिस्थितीमध्ये अस्मिताच काय पण जीवन जगण्याचा हक्कच नव्हे तर जिवंत राहणे सुद्धा कठीण आहे. अशावेळी एकच उपाय शिल्लक राहतो, तो म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली शिकवण, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि ह्या शिकवणुकीतून जर आपल्याला आपला मार्ग सापडला नाही, म्हणजे मानवी जीवन जगण्याचा हक्क जर आपल्याला मिळणार नसेल तर, कार्ल मार्क्सचा उपाय आहे, तो म्हणजे ” दुनिया को बदल डालो ” समतावादी क्रांती करा सरकार बदला आणि आपण आपले हक्क साबूत ठेवा.

         वर्तमान परिस्थितीत मी आजच्या घडीला जिवंत राहू शकेल की नाही? अशी मानसिक अवस्था देशातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली असेल तर, अशावेळी यावर उपाय म्हणून हे दोनच मार्ग आहेत, एक बाबासाहेबांचा संघर्षाचा मार्ग, आणि दुसरा कार मार्च क्रांतीचा मार्ग. असलेल्या व्यवस्थेत राहूनच ही व्यवस्था बदलणे म्हणजे बाबासाहेबांचा मार्ग होय, आणि असलेली व्यवस्थाच उखडून फेकून टाकून देणे म्हणजेच कार्ल मार्क्स मार्ग होय. अर्थात उद्देश दोघांचा एकच आहे तो म्हणजे समताधिष्ठित समाज रचना स्थापन करणे, परंतु अशी रचना स्थापन करण्यासाठी जे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, या दोन मार्गांपैकी कोणत्या मार्गाने गेल्यास आपल्याला आपले हक्क जीवन जगण्याचा हक्क जिवंत राहण्याचा हक्क आणि अस्मिते सहजीवन जगण्याचा हक्क मिळेल यावर आपणच काय तो विचार करून मार्ग स्वीकारला पाहिजे.

    ही विषमतावादी व्यवस्था उकडून टाकण्यासाठी बाबासाहेबांचा जो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मार्ग या 77 वर्षात आपण धरला नाही का? धरला नाही तर त्याचे कारण काय ? याचा पण विचार करण्याची सध्या गरज आहे.

       हुकूमशाही व्यवस्थेत राहून लोकशाहीच्या मार्गाने लढाई करून सत्ता बदलता येते, हा जगाचा अनुभव आहे, लोकशाहीने हिटलर आणि मुसोलिनीचा सुद्धा पराभव केला, इंग्रज सत्तेचा सुद्धा पराभव केला, परंतु व्यवस्थेचा पराभव करता आला नाही, आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता असलेली ही व्यवस्था बदलता आली नाही, याचा अर्थ लोकशाही मार्गाने सत्ता बदलता येते परंतु व्यवस्था बदलता येत नाही हे सिद्ध होते. व्यवस्था बदलायचे असेल तर, काल मार्क्सने केलेले प्रयोग काही देशात यशस्वी ठरले आहेत, त्या देशात व्यवस्था बदलली, सरकार बदलले, व्यवस्था ही समतेचीच आणि सरकारही समतेच्याच विचाराचे आले, आणि तेही केवळ सामाजिक समतेचेच नव्हे तर आर्थिक समतेचे सरकार आणि व्यवस्था आणि संविधान.

       काही देशात एवढी क्रांती होऊन ही तिथे परत प्रतिक्रांती झालेली आहे किंवा होत आहे, याचे कारण म्हणजे जगात अनेक देशांमध्ये जे भांडवलशाही विचाराचे देश आहेत, सरकारे आहेत, ते सर्व संघटित होऊन, समतावादी विचार असलेल्या काही देशातील सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यात ते यशस्वी पण होत आहेत, याचा अर्थ काल मार्क्सचा विचार चुकीचा आहे असा होत नाही तर, समतावादी शक्ती ही विषमतावादी शक्तीच्या पुढे कमजोर पडत आहे, म्हणून समतावादी शक्ती अधिक मजबूत करणे, विषमतावादी शक्तीच्या अगदी विरोधात ठामपणे उभे राहणे, आणि विषमतेच्या विरोधात समतेची शक्ती जेव्हा जोर धरेल तेव्हा विषमतेचा पराभव होईल आणि समतेचा विजय होईल, आणि अशी परिस्थिती जेव्हा येईल, तेव्हाच माणसाची गुलामी नष्ट होऊन त्याला खरे अस्मिते सहित जीवन जगण्याची हक्क मिळतील.

       तात्पर्य हे की, केवळ सत्ता बदलल्याने समता प्रस्थापित होणार नाही, तर त्यासाठी व्यवस्था परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे, आणि समतेची म्हणजे आर्थिक आणि सामाजिक समतेची राज्यघटना असणे आवश्यक आहे. याचा अर्थ समतेची व्यवस्था, समतेची राज्यघटना, आणि समतेचे सरकार या तीन गोष्टी एकत्र असणे त्यांचा ताळमेळ आवश्यक आहे.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

   दिनांक : 26 डिसेंबर 2025. फोन : 9420912209