विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांना त्रास दिला जातो : उदयकुमार आहेर 

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

पुणे : पंढरपुरात पांडुरंगाच्या ऐन दर्शनावेळी देवस्थानाचे कर्मचारी, विशेषतः महिला कर्मचारी पांडुरंगाला व भक्तांना दोन सेकंदासाठी का होईना एक होऊ देत नाहीत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर व महिला सरचिटणीस वैशालीताई जवंजाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

         पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने राज्यातील तसेच राज्याबाहेरील वारकरी व भाविक पंढरपुरात दर्शनाला येत असतात. त्यातील अनेक भाविक आपल्या गरिबीच्या परिस्थितीमुळे आयुष्यात एकदाच पंढरपुरात येऊ शकतात. पंढरपुरात जाऊन आपल्या लाडक्या पांडुरंगाला डोळे भरुन पहावे, त्याचा चरण स्पर्श करावा, त्याच्याशी मनातील दोन गोष्टी बोलाव्यात, त्याच्याकडे हट्ट करावा, त्याच्या समोर नतमस्तक व्हावे, त्याच्याशी भांडावे, आयुष्यात आजपर्यंत कधीही दर्शनाला येऊ शकलो नाही म्हणून त्याची समजूत काढावी, त्याची माफी मागावी, भविष्यातील आयुष्यासाठी, घरातील पोरा बाळांसाठी, रानातील गुराढोरांसाठी, आप्तस्वकीयांसाठी त्याच्या समोर पदर पसरुन काहीतरी मागावे अशा एक ना अनेक भावना दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या मनात घर करुन दर्शनासाठी निघण्याच्या अनेक महिने आधीपासून घोळत असतात. खूप मोठया अपेक्षाने घरातील किडूक मीडुक मोडून, कष्टाने उभे केलेले पैसे खर्च करुन, अगदी मिळेल त्या स्वस्त वाहनाने प्रवास करुन डोळयात पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन वारकरी व पांडुरंगाची लेकरं पंढरपुरात दाखल होतात. मात्र पांडुरंगाच्या मुर्तीसमोर ऐन दर्शनाच्या वेळी देवस्थानाचे कर्मचारी भाविकांच्या पाठीत गुद्दे मारणे, चिमटे काढणे, नखांनी ओरबाडणे, धक्के देणे असले प्रकार करुन पांडुरंग व भक्तांना दोन सेकंदासाठी का होईना एकरुप होऊ देत नाहीत. दहा-दहा तास रांगेत उभे राहिल्यानंतर पांडुरंगाच्या मुर्तीजवळ पोहोचताच भाविकांच्या भावनांचा बांध तुटतो आणि अशाच वेळी तिथे तैनात असणाऱ्या महिला कर्मचारी भक्तांच्या पाठीत गुद्दे मारतात, नखांनी ओरबाडूण त्या भक्ताला पांडुरंगापासून दूर केले जाते. मग ज्यावेळी पांडुरंगाच्या भेटीचा मनाचे पावित्र्य राखणारा क्षण भाविक अनुभवणारच असतो त्याचवेळी त्याला बाजूला करणाऱ्या कर्मचाऱ्याविषयी त्याच्या मनात संतापाची भावना येवून चिड निर्माण होते आणि गेली अनेक महिने नव्हे नव्हे तर आयुष्यभर पाहिलेले पांडुरंगाच्या भेटीचे स्वप्न एका क्षणात मोडून पडते. असे हे कटू प्रसंग टाळणे सहज शक्य आहे. मंदिरात भाविकांची गर्दी असते हे आम्हाला मान्य आहे. सर्वच भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून अगदी कमी वेळ प्रत्येकाने मुर्तीजवळ थांबावे हे ही आम्हाला मान्य आहे. मात्र, देवस्थानाच्या कर्मचान्यांकडून दिली जाणारी संतापजनक वागणूक कोठेतरी थांबावयास हवी आणि सामान्य गोरगरिब वर्गातील पांडुरंगाच्या भक्तांना न्याय मिळायला हवा. यासाठी सरकारकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही प्रयत्न करुन वारकरी तसेच गोरगरिब भक्तांना न्याय मिळवून देणार आहोत.