Home सांस्कृतिक आळंदीत परंपरेनुसार श्री गणेश प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न…

आळंदीत परंपरेनुसार श्री गणेश प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : भाद्रपद शुद्ध चतुर्थी निमित्त आळंदी नगरीत श्री गणेश प्रतिष्ठापना सोहळा भक्तिभावाने पार पडला. परंपरेनुसार ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पुरातन गणपती मंडपात श्री गजानन गणेशाची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक संपन्न झाली.

         सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. हरीनामाच्या गजरात, वेदघोषांच्या मंगल ध्वनीत व जयघोषांच्या उत्साहात संपूर्ण परिसर भारावून गेला. या सोहळ्यासाठी ११ ब्रह्मवृंद उपस्थित होते. शास्त्रोक्त मंत्रोच्चारांमध्ये प्राणप्रतिष्ठा विधी पार पाडण्यात आला.

         आळंदी देवस्थानचे विश्वस्त श्री चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा) यांच्या शुभहस्ते गणरायाची प्रतिष्ठाविधी संपन्न झाला. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, परंपरागत मानकरी योजीराज कुऱ्हाडे पाटील, योगेश आरु तसेच देवस्थान कर्मचारीवृंद, भाविक भक्त उपस्थित होते.