शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पळसगांव(पि):- खरीप हंगाम २०२२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम नियोजन पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी मदनापूर येथे आयोजित करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून खरीप हंगामात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणात खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची पूर्वतयारी खोल नांगरणी कुळवणीचे महत्त्व मृदा परीक्षण तसेच मृदास्वास्थ्य पत्रिकेचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच सुधारित वाणांची निवड,बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आणि सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली.फंगीसाइड व जैविक प्रक्रियेचा वापर करून बियाणे प्रक्रिया करण्याचे महत्त्वही शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमात सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर हवामानानुसार योग्य पिकांची निवड आणि पेरणी पद्धतीबाबत विशेष माहिती देण्यात आली सोयाबीन पिकासाठी बिबीएफ अष्टसूत्री पध्दत कापूस पिकासाठी रुंद सरी-वरंबा पध्दत तसेच भात पिकासाठी श्री पध्दतीने लागवड करण्याचे फायदे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगण्यात आले.
याशिवाय पिकांमध्ये योग्य वेळ,अंतर राखून पेरणी करणे तसेच एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचें आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी आर.बी.सोनवणे,सहाय्यक कृषी अधिकारी पी.पी.पवळ आणि सहाय्यक कृषी अधिकारी बी.बी.येवले यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने शेतकरी तसेच महिला शेतकरी उपस्थित होत्या.
कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना योग्य दिशा मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.



