दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी देवाची – तक्षशिला बुद्ध विहार येथे संविधान दिनानिमित्त भव्य, सर्वसमावेशक आणि सांस्कृतिक वैविध्याने सजलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील विविध घटकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जा लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर झालेल्या बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पठणाने कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि चिंतनशील वळण मिळाले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करताना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा पुन्हा एकदा ठसा उपस्थितांच्या मनावर उमटला.
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयु. नामदेव सुरपल्लीकर आणि आयु. आनंद रणदिवे यांनी संविधान मूल्यांवरील मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. समाजातील समत्व, न्याय, बंधुभाव वाढीस लागण्यासाठी संविधान कसे मार्गदर्शक ठरते याचे त्यांनी अत्यंत प्रभावी विवेचन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि संविधान निर्मितीतील अद्वितीय योगदानाचा गौरवही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप धम्मपालन गाथेने शांततामय वातावरणात झाला. समाजातील सर्व घटकांनी संविधानातील मूल्यांची जपणूक करावी, बंधुभाव बळकट करावा आणि सामाजिक समरसतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमाला तक्षशिला बुद्ध विहार समितीचे विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड, सुभाष भोसले, बाळासाहेब पो.भोसले, बाळासाहेब दा.भोसले, प्रविण रंधवे, भिमराव थोरात, प्रशांत रंधवे, संजय रंधवे, श्रेयस रणदिवे, महेंद्र रंधवे, रोहित थोरात, दिलीप वहिले, विलास रणपिसे, चारुदत्त रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.



