Home देशविदेश यत्न तो देव जाणावा…

यत्न तो देव जाणावा…

             देव मानणाऱ्यांची संख्या जगात 70 टक्के आहे.आणि न मानणाऱ्यांची संख्या 30 टक्के आहे.म्हणजेच जगात 70 टक्के आस्तिक आणि 30 टक्के नास्तिक आहेत.परंतु गंमत अशी की,नैतिकतेचा देवाशी संबंध जोडला गेला,हे चुकीचे आहे.कारण देव मानणारे नैतिकतेने वागतात आणि नास्तिक अनैतिकतेने वागतात,असा गैरसमज आहे,हे चुकीचे आहे.कारण नैतिकचा आस्तिक आणि नास्तिक असण्या शी काहीच संबंध नाही.याचा पुरावा म्हणजे माणसाचे वर्तन.आपण व्यवहारात पाहतो की,भोळ्या भाबड्या लोकांना भुलथापा देऊन,त्यांचे शोषण करणारे,त्यांना फसविणारे, अंधश्रद्धाचे नावाने त्यांची होणारी शारीरिक हिंसा,आर्थिक फसवणूक हे पाप काय कमी नव्हे.

            अत्यंत वाईट गोष्ट ही की,देवाच्या नावाने श्रम न करता,पुजारी,महाराज, वैरागी, साधू, गुरु,गोसावी ,ब्राम्हण , जंगम बनून भीक मागणे,गरिबांनी,वारकऱ्यांनी पण भीक मागणे म्हणजे ऐतखाऊ पण आहे.ही एक जगात फार मोठी जमात किंवा वर्ग आहे.भिकाऱ्यांच्या या वर्गात पण गरीब मध्यम श्रीमंत असे तीन वर्ग आहेत.गरीब भिकारी देवापुढे लाचारीने तोंड लहान करून भक्तांना भीक मागतो,भक्त देवळात जाऊन देवाला भीक मागतात आणि देव भक्ताला भीक मागतो,ही भीक पैश्याच्या,सोन्याच्या,चांदीच्या,चादरीची ,भरजरी कपड्याची असते,जी भक्त देवाला देतो.त्या बदल्यात देव भक्ताला मोठी भीक देतो.जी नवस बोलून मिळवलेली असते.

           गरीब भिकारी रस्त्यावर,ट्रेनमध्ये,इतरत्र मागत असतात,अर्थात यात म्हातारे,अपंग,प्रौढ,तरुण,बालक सर्वच थरातील असतात.तृतीयपंथीय यांचे जीवन तर भिकेवरच असते.मध्यम भिकारी महाराज ,पुजारी ,गोसावी, गुरू हे असतात.यांना मिळालेली भीक ही प्रतिष्ठेची असते. बौद्ध धर्मात तर भिक्कुसंघच असतो.प्रत्येक धर्मात देवाला देवळाला लहानपणीच लहान बालके दान करतात.तेच पुढे पुजारी किंवा मठपती होतात.मोठ मोठ्ठ्या देवस्थानचे पुजारी, मठाधिश तर गर्भ श्रीमंतच असतात.जे भक्तांच्या भिकेवरच जगतात,त्यात भर म्हणून देवालयाचा पैसा संपती सोने जमीन यांचे ते मालकच असतात.लोक त्यांना “दक्षिणा” या नावाने पैसे देतात,तेही पाया पडून.

           अर्थात गरीब मध्यम श्रीमंत कोणत्याही वर्गाचा भिकारी असो,तो शेवटी भिकारीच असतो.भिकारी याचा अर्थ परावलंबी,दुसऱ्याच्या मेहनतीवर जगणारा परोपजीवी प्राणी होय.यालाच बांडगुळ पण म्हणतात.बांडगुळ म्हणजे मूळ झाडाचे शोषण करून त्यावर मोठे होणारा.अर्थात हे भिकारी कितीही श्रीमंत असले तरी लाचारीचेच जीवन जगतात.कारण भीक मागणे म्हणजे लाचारीचे जीवन जगणे होय.आपकी कमाई होना,बापकी नहीं ,असा विचार,असा आत्मविश्वास,एव्हडी हिंमत यांच्यात नसते.हे भित्रे असतात.”जीवन म्हणजे संघर्ष” समजून कष्टाचे ,मेहनतीचे,परिश्रमाचे,नोकरीचे,प्रयत्नाचे ,संकटावर मात् करण्याचे जीवनापासून हे भिकारी पलायन करतात.कारण हे स्वतःतील कौशल्य क्षमता गमावून बसलेले असतात,धर्माने पण यांना असे बनविले आहे.

          देवाचे नावाने हे भिकारी बनतात,भीक मागतात.नाव देवाचे घेतात,आणि भीक हे श्रमिक देतात.बौद्धिक अशी की शारीरिक श्रम करून,मिळविलेला पैसा अडाणी लोक हे या ऐतखाऊ लोकांना देतात.खरे तर हे पुण्य नसून पापच आहे,कारण देणाऱ्या लोकांनी किंवा सरकारनी ठरविले की,ऐतखाऊना भीक द्यायची नाही,देवाला पण भीक द्यायची नाही,असे घडले तर भिकाऱ्यांचे भीक मागणे बंद होईल आणि ते श्रम करून आपले जीवन जगतील.याचा अर्थ भिकाऱ्यांना भिकारी कोण बनवित आहेत? तर भीक देणारे,देवळाला दान देणारेच भिकारी आणि ऐतखाऊ समाज निर्माण करीत आहेत.हे आस्तिक लोकांच्या डोक्यात कधी येणार?

         कष्ट करून ,मेहनत करून स्वाभिमानी जीवन जगा,लाचारीचे जीवन जगू नका,स्वतः भिकारी होऊ नका,इतरांना पण भिकारी बन येऊ नका,असा उपदेश,सल्ला,शिकवण आई वडिलांनी मुलांना दिली पाहिजे.

          श्रम म्हणजेच देव, कष्ट घाम यातच खरा परमेश्वर असतो.स्वर्ग पण असतो,हे जग या दोन हातानी केलेल्या श्रमामुळे निर्माण झाले आहे.श्रमिकच विश्व निर्माता आहे.अशी शिकवण हवी.श्रम करणे हेच पुण्याचे काम होय,आणि ऐतखाऊपणा,व्याजाचे पैसे,इतरांचे शोषण,पिळवणूक,श्रमिकांना कमी पैश्यात जास्तवेळ काम करायला लावणे,भरमसाठ नफा कमावणे,चोरी मारामारी हिंसा करून संपती मिळविणे,भ्रष्टाचाराची संपती म्हणजे पापाचा पैसा,पापाची संपती,त्यावर ऐतखाऊ जगणे म्हणजे पाप होय,असणे देव प्रसन्न होत नाही,नवसाला पावत नाही,साथ देत नाही.अशी शिकवण आस्तिक लोकांनी दिली पाहिजे.याउलट अंधश्रधा चमत्कार,देव दैव हे कारण पुढे करून गरीबी भिकारी कायम ठेवल्या जाते. संपविले जात नाही.

         महात्मा बसवेश्र्वरांनी तर कामातच खरा स्वर्ग आहे,हे सांगितले.कारण स्वर्ग म्हणजे समृद्धी,सुखी जीवन हे श्रमाशिवाय मिळत नाही.श्रमिकांनी श्रमच केले नाहीत तर शेतात कारखान्यात निर्माण होणाऱ्या वस्तू निर्माणच होणार नाहीत.स्वर्ग म्हणचे सुखाची रेलचेल,ही उपभोगाच्या वस्तूद्वारेच मिळते. शाहीर दिगू तुमवाडच्या काव्यात पण आहे ,ते गीत गातात ते असे “देव नसे दगडात ,वेड्या देव असे श्रमात ” अशी शिकवण देताना ,गणांचा गण ऐवजी त्यांच्या कलापथक चे गण हे ” कष्टकरी जनता भूषण भारता,वंदन करितो पडदलिता ” असे आहे.” जनदेवते श्रमदेवते आम्ही अजाण आपुली मुले,प्रसन्न करण्या तुला वाहतो कर्तव्याची फुले ” ही कार्यकर्त्यांच्या बैठकी आधी किंवा शिबिर सुरू होण्या आधीची प्रार्थना आहे.यातून त्यांनी हेच सांगितले आहे की,श्रमिक हाच देव आहे.किंवा श्रमातच देव आहे.अशी आस्थिकांची श्रद्धा बनली तर सर्वांनाच नक्कीच अछे दीन येतील.

         श्रमाचे महत्त्व जाणुनच गाडगेबाबांनी हातात झाडू घेतला,आधी गावात झाडू मारूनच मग एक दोन घरी भाकरीची भीक घ्यायचे.गांधीजी, बाबा आमटे यांनी पण कॉलेजच्या तरुण साठी श्रमशिबिरे घेत असत.यातून श्रमाला प्रतिष्ठा मिळून देणे,हाच उद्देश होता.

          बौद्धिक किंवा शारीरिक श्रम करणे ,प्रामाणिकपणे आपापले कर्तव्य निभावणे म्हणजेच देवपूजा,आराधना,प्रार्थना,नमाज, आरती होय.अन्यथा बाकी कर्मकांडच होय.अवडंबर होय,म्हणजे केवळ दिखाऊपण होय.भक्ती चे प्रदर्शन करण्याची गरज नाही.दोन हस्तक एक मस्तक आणि मनीचा भाव हेच पुरेसे आहे.पण श्रमाशिवाय देव नाही.म्हणजेच देव आणि श्रम यांचे नाते एव्हढे जवळचे आहे की,शरीर आणि प्राण या सारखे.प्राण असेल तर शरीर आहे,आणि शरीर असेल तरच प्राण आहे.म्हणूनच श्रम आणि देव याची फारकत म्हणजे मृतप्राय भक्ती होय.म्हणूनच संतांचा आदर्श भक्तांनी घ्यावा तो असा की,देवपूजा,कर्मकांड,तीर्थाटन, अनुष्ठान हे काहीच न करता,मुखी नाम हाती काम,हाच संतांचा आदर्श घेतला पाहिजे.संत देवाला भेटायला गेले नाहीत, तर देवच संताकडे आला,नुसता भेटायला नाही तर त्याने संताचे घरी शेतात काम करू लागला.कारण देवाला सुद्धा श्रमाचे महत्व कळले होते.म्हणूनच पांडुरंगाने पण सर्वच संतासोबत कष्टाची कामे केली.प्रसंगी त्याला स्त्री पण होऊन जनाबाई सखुबाईची कामे करावी लागली.हा आदर्श ह. भ. प. कीर्तनकार घेतील का ?

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 26 ऑगस्ट 2025.फोन : 9420912209.