Home सांस्कृतिक ‘ज्ञानोबा-ज्ञानोबा’च्या जयघोषात माउलींच्या पादुकांना नीरा स्नान; लोणंदनगरीत विसावणार भक्तीचा महासागर…

‘ज्ञानोबा-ज्ञानोबा’च्या जयघोषात माउलींच्या पादुकांना नीरा स्नान; लोणंदनगरीत विसावणार भक्तीचा महासागर…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पुणे — ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात गुरुवारी (दि.२६) रोजी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना पुणे-सातारा सीमेवरील पवित्र नीरा नदीच्या तीर्थपात्रात पारंपरिक स्नान घालण्यात आले. वारकरी संप्रदायातील या नीरास्नानाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, या सोहळ्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील लोणंदनगरीत भक्तांचा महासागर लोटला आहे.

       माउलींचा पालखी सोहळा दुपारी दोन वाजता जुन्या नीरा पुलावरून दत्तघाटावर पोहोचला. हजारो वारकऱ्यांच्या टाळ-चिपळ्यांच्या गजरात, रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्यांमधून माउलींच्या पादुका घाटावर नेण्यात आल्या. या वेळी “माउली-माउली” चा गगनभेदी जयघोष दुमदुमत होता. श्रीगुरु हैबतबाबांची जन्मभूमी आणि सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या नीरास्नानाने पालखी सोहळ्याचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. या स्नान सोहळ्यासाठी लाखो भाविक, मानकरी आणि वारकरी भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.

        या पावन प्रसंगी, पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील, राहुल चिताळकर पाटील व इतर मानकऱ्यांच्या उपस्थितीत पादुकांना स्नान घालण्यात आले. घाट परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता, तर वाद्यांच्या गजरात नीरास्नानानंतर माउलींच्या स्वागतासाठी प्रशासनाचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पालखीने सायंकाळपर्यंत लोणंद येथे मुक्काम साधला असून, पुढील प्रवास सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे होणार आहे. नीरा नदीच्या साक्षीने भक्तिभावाने न्हालेला हा क्षण, वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेतील एक सोनेरी अध्याय ठरला आहे.