ब्रेकिंग न्युज… जाधववाडी धरणात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू… — एनडीआरएफच्या जवानाने वाचविला दोघांचा जीव…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे जाधववाडी धरणावर फिरायला गेलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला तर एनडीआरएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला. ही घटना मंगळवारी (दि.25) सायंकाळी 6:15 वा. जाधववाडी धारण नवलाख उंब्रे ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडली.

 

आदित्य शरद राणे (वय 21, सध्या रा. नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ मध्य प्रदेश) धरणात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. भीमाशंकर दिनेश मठपती (वय 21) व किरण किशोर थोटे (वय 22, दोघेही सध्या रा. नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज, तळेगाव दाभाडे, ता. मावळ ) अशी जीव वाचलेल्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज मधील संगणक शाखेचे तृतीय वर्षाचे आदित्य राणे, भीमाशंकर मठपती, किरण थोटे व राजलक्ष्मी नानासाहेब वराट (वय 20) हे 4 विद्यार्थी जाधववाडी धरण परिसरात फोटो काढण्यासाठी व फिरण्यासाठी गेले असता, दिवसभर तीव्र उष्णता असल्याने आदित्य राणे हा आंघोळीसाठी धरणात गेला. त्याला पोहायला येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला, त्यांचे मित्र भीमाशंकर मठपती व किरण थोटे यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याची खोली अधिक असल्याने तेही बुडू लागले. 

 

एन डी आर एफ चे जवान रुपेश आजम याने प्रसंगावधान ओळखून त्या दोघांना वाचविले. तसेच आदित्य राणे याचा शोध घेऊन बाहेर काढले पण त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार पांडे, पोलीस अंमलदार सचिन कचोळे, अशोक काठे, विठ्ठल मस्के, रोहित माने, राज परबाणे आदींनी धाव घेतली.

 

मृतदेह ताब्यात घेऊ पंचनामा करून मृतदेह तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. 

 

जाधववाडी धरण परिसरात पूर्वी दगडाच्या खाणी असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. या धरण परिसरात पोहण्यास तसेच धरण परिसरात फिरण्यास मज्जाव केला आहे. या धरणात अनेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या वतीने गस्त सुरू असते तसेच सूचना फलक लावले आहे. पर्यटक जाणून बुजून धरणात पोहतात त्यांना मज्जाव केला तर भांडणाचे प्रकार घडतात. 

– वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत