दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीत कुऱ्हाडे कुटुंबाने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकीय पटलावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा ठसठशीतपणे सिद्ध केले आहे. कुऱ्हाडे कुटुंबाशी थेट व नातेसंबंधातून संबंधित एकूण सात सदस्य नगरपरिषदेत निवडून आल्याने आळंदीच्या राजकारणात हे कुटुंब ‘धुरंधर’ ठरले आहे.
भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदी प्रशांत कुऱ्हाडे यांची निवड झाली असून, यामुळे या यशाला कळस चढला आहे. याचबरोबर प्रभाग क्रमांक तीनमधून सोमनाथ कुंडलीक कुऱ्हाडे, प्रभाग क्रमांक चारमधून सागर उर्फ गोविंद कुऱ्हाडे, प्रभाग क्रमांक सहामधून सागर उर्फ हेमंत कुऱ्हाडे तसेच साक्षी अक्षय कुऱ्हाडे हे सर्व भाजपकडून विजयी झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांसह पाच कुऱ्हाडे थेट नगरपरिषदेत दाखल झाले आहेत.
याशिवाय ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग कुऱ्हाडे यांची कन्या व नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांची बहीण ऋतुजा आदित्य घुंडरे यांनीही निवडणुकीत विजय मिळवला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष विलास सोपान कुऱ्हाडे यांची कन्या पुजा संजय घुंडरे या सुद्धा विजयी झाल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असतानाही कुऱ्हाडे कुटुंबाशी संबंधित सात सदस्य नगरपरिषदेत पोहोचले आहेत.
संघटित प्रचार, स्थानिक प्रश्नांची अचूक मांडणी आणि मतदारांशी असलेला थेट संवाद हे या यशामागचे प्रमुख कारण असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. विशेषतः भाजपच्या मजबूत संघटनात्मक यंत्रणेचा मोठा फायदा कुऱ्हाडे कुटुंबाला झाल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आळंदीच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यावर भर दिला जाईल, असा निर्धार विजयी प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. “जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत पारदर्शक, गतिमान आणि विकासाभिमुख कारभार करू,” असे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सांगितले.



