अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा :- कुही (ता. चिखलदरा) येथील मुंगीलाल सानु सेलुकर हा आदिवासी युवक जंगलात इंधन गोळा करण्यासाठी गेलेला असताना अचानक उग्र झालेल्या अस्वलाने त्याच्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात मुंगीलाल गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने इर्विन रुग्णालय, अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमी मुंगीलालची प्रकृती जाणून घेण्यासाठी अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी आज रुग्णालयाला भेट देत उपचार सुरू असलेल्या वार्डमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांनी जखमी व त्याच्या कुटुंबीयांची समक्ष विचारपूस केली.
यावेळी रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौंदळे यांच्याशी खासदारांनी चर्चा करत जखमीला उत्तम वैद्यकीय उपचार, आवश्यक औषधे व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
खासदार वानखडे म्हणाले, “जंगल भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे जीव वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रशासनाने अशा घटनांवर नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात.”
या भेटीदरम्यान राहुल येवले (उपसभापती कृ. उ. बा. स. धारणी), सुधीर गावंडे, तसेच सेलुकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
जखमी मुंगीलालवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागाने अस्वल हालचालींबाबत स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



