Home सांस्कृतिक “हरिनामाच्या गजरात माउलींचा पालखी सोहळा वाल्हेनगरीत विसावला”…

“हरिनामाच्या गजरात माउलींचा पालखी सोहळा वाल्हेनगरीत विसावला”…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पुणे :– “ज्ञानोबा-तुकाराम” चा गजर, टाळ-मृदंगांचा नाद आणि भक्तीभावाने भरलेले वातावरण… संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा बुधवारी आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हेनगरीत उत्साहात आणि श्रद्धेने विसावला. खंडोबाच्या जेजुरी नगरीतून पहाटे सहाच्या सुमारास निघालेल्या या सोहळ्याने, सकाळी साडेदहा वाजता दौंडज येथे ग्रामस्थांच्या जल्लोषात स्वागत घेत, दुपारी ११.४० वाजता वाल्हे गावाच्या वेशीवर प्रवेश केला.

       या प्रसंगी “माउली माउली” च्या जयघोषात ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत मनोभावे स्वागत केले. स्वागतासाठी सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, माजी सरपंच अमोल खवले, प्रा. संतोष नवले, उद्योजक गोरख कदम, तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           पोलिस प्रशासनाच्या अचूक नियोजनामुळे केवळ एका तासात पालखी सोहळा सुकलवाडी फाट्याजवळील पालखीतळावर पोहचला. तेथे ग्रामस्थांच्या खांद्यावर पालखी नाचवत प्रदक्षिणा घालण्यात आली. चोपदारांच्या सूचना झाल्यानंतर समाजआरती पार पडली आणि भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या.

         यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे, ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पोलिस अधिकारी तानाजी बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

       दरम्यान, गुरुवारी सकाळी माउलींची पालखी निरा स्नानासाठी प्रस्थान करणार असून संध्याकाळपर्यंत लोणंद मुक्कामी पोहोचणार आहे.

ग्रामप्रदक्षिणा रद्द, ग्रामस्थांमध्ये खंत

        यंदाही पालखी ग्रामप्रदक्षिणा न करता थेट पालखीतळावर पोहचली. मागील काही वर्षांपासून वेळेच्या अभावामुळे आणि जेवणाच्या वेळेत अडथळा येत असल्याने ग्रामप्रदक्षिणा बंद करण्यात आली आहे. मात्र यावर्षी पालखी वेळेआधीच पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये ती होऊ शकली असती, अशी भावना व्यक्त करण्यात आली. पुढील वर्षी महामार्गाचे काम पूर्ण होईल आणि पालखी अधिक लवकर पोहोचेल, अशा आशेने ग्रामस्थांनी ग्रामप्रदक्षिणा पुन्हा सुरू होईल, ही अपेक्षा व्यक्त केली आहे.