रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
डॉ.अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राच्या प्रयत्नांमुळे चिमूर विधानसभा क्षेत्रात चंदन लागवडीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. डॉ. पिसे यांनी ‘चिमूर विधानसभा ही चंदनाची विधानसभा’ म्हणून साकारलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे.
या उपक्रमाअंतर्गत यावर्षी मान्सूनपूर्व कालावधीत चिमूर व नागभीड परिसरात १००० हून अधिक चंदनाची रोपे शेतकऱ्यांनी लावली आहेत. हे एक मोठे यश असून, चंदन शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी चंदन लागवडीचे महत्त्व, त्याची बाजारपेठ आणि आर्थिक फायदे समजून घेतले. केंद्राच्या सततच्या प्रशिक्षण, मार्गदर्शन व रोपे उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.
डॉ.अजय पिसे यांनी सांगितले की, “चंदन शेती ही शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा एक चांगला पर्याय आहे. येत्या काही वर्षांत चिमूर विधानसभा ही संपूर्ण महाराष्ट्रात ‘चंदनाचे क्षेत्र’ म्हणून ओळखली जाईल, असा आमचा विश्वास आहे.” या उपक्रमामुळे चिमूर आणि नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास मिळाला असून, येत्या काही दिवसातच आणखी मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



