आळंदी-केळगाव सोसायटीसह अन्य सहकारी पतसंस्थाच्या निवडणुका परत घ्याव्यात…. — पराभूत उमेदवारांनी केली मागणी…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

        आळंदी : खेड तालुक्यातील नुकत्याच झालेल्या सहकारी पतसंस्था व काही सोसायटी यांच्या निवडणुकीत बोगस मतपत्रिकांचा वापर केलेला आहे. या निवडणुका पारदर्शक झालेल्या नाहीत. त्यामुळे काही उमेदवारांना पराभवाचा धक्का चुकीच्या पद्धतीने सोसावा लागला आहे.यात निवडणूक निर्णय अधिकारी व इतर लोक गुंतले आहेत. त्यांची चौकशा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना निवेदने देण्यात येणार आहे. या निवडणुका पुन्हा घ्याव्यात, अशी मागणी या संस्थांतील पराभूत उमेदवार यांनी केली आहे. चाकण (ता. खेड) येथील साईबाबा पतसंस्थेच्या निवडणुकीत बोगस मतपत्रिका आढळल्या होत्या. त्यानंतर वाद होऊन अगदी पोलिस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले. त्यामुळे मतमोजणी झाली नाही. या पार्श्वभूमीवर चाकण, शिरोली येथील पतसंस्थेच्या व भोसे, आळंदी केळगाव सोसायटीच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मागणी केली. 

यावेळी बाळासाहेब गायकवाड, राम गोरे, पांडुरंग गोरे, रोहन कांडगे, मंगल जाधव, अनिल सोनवणे, हरीश देखणे, अशोक चव्हाण, सयाजी गांडेकर, मुचकुंद जाधव, साहेबराव कुऱ्हाडे, अशोक जाधव, शंकरराव कुऱ्हाडे, हनुमंत कुटे, मुबीन काझी, उमेश आगरकर, अनिल शेवकरी, प्रशांत गोरे, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

साईबाबा पतसंस्थेबाबत जो प्रकार झाला असेल, त्याची चौकशी केली जाईल. कोणी दोषी आढळले; तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. याबाबत माहिती निवडणूक प्राधिकरणाला दिली जाईल. निवडणूक प्राधिकरणाने निर्णय दिला, तर फेरमतदान घेतले जाईल. अजून मतपेट्या पोलिस ठाण्यात आहेत.

– हरिश्‍चंद्र कांबळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, खेड