आळंदीत उन्हाळ्यातच पावसाळा… — इंद्रायणी नगर भागातील नागरिकांकडून पिण्याचा पाण्याचा अपव्य….

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी गेली तीन वर्षांपासून भामा आसखेड जलाशयातून पुणे महापालिकेच्या सहकार्यातून व काही अंशी रक्कम अदा करून आळंदीकरांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जात आहे. मात्र याच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नागरिकांकडून विशेषत: येथील इंद्रायणी काठी असणाऱ्या इंद्रायणी नगर भागातील प्रत्येक गल्लीतून अपव्य होत असल्याचे दिसून आले. आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान नळाला आलेले मुबलक पाणी नागरिकांनी पिण्यासाठी तर वापरलेच शिवाय त्याचा दुरुपयोग म्हणून आपल्या अंगणातील तसेच रस्त्यावर पाणी मारून हजारो लिटर पाणी आज इंद्रायणी नगरच्या प्रत्येक गल्लीतून वाहताना दिसले. त्याचबरोबर नवीन पूल एसटी बस स्थानक या परिसरात देखील असंख्य व्यावसायिक आहेत त्यांनी देखील पाण्याचा गैरवापर करून पिण्याचे शुद्ध पाणी आपली दुकाने व समोरील परिसर धुण्यासाठी वापरून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करताना दिसून आले.

एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना या भागातील नागरिक मात्र त्याचा दुरुपयोग करून पाण्याचे योग्य नियोजन न करता ते नाहक वाया घालवत असताना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले. सदरील पाणी आपण महापालिकेकडून विकत घेऊन नगरपालिकेमार्फत पित आहोत. याचा विचार करून नागरिकांनी वागावे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

यासंदर्भात आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याशी संपर्क साधून सत्य घटना कानावर घातली असता त्यांनी सांगितले की,यापुढे असे पाणी ज्याच्या अंगणातून दुकानासमोरून रस्त्यावर येताना दिसले तर संबंधितांचे नळ कनेक्शन ताबडतोब बंद केले जाईल असेही केंद्रे यांनी सांगितले.

स्थानिक नागरिक संतोष भिवरे यांची प्रतिक्रिया:

 देहू फाटा परिसरातील स्थानिक नागरिक संतोष भिवरे यांनी सांगितले की, आमच्या जुन्या नळाला तीन वर्षांपासून पाणी येत नाही त्या संदर्भात तक्रार करूनही अधिकारी व स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाहीत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पिण्याचे पाणी विकत घेऊन पित आहोत. नवीन नळजोड कनेक्शन देत नाहीत, त्यासाठी जानेवारी 2023 मध्ये पैसे देखील भरले आहेत मात्र परिस्थिती “जैसे थे”अशी तक्रार संतोष भिवरे यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधींकडे केली आहे.