शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर नगर परिषद व भिसी नगर पंचायतमधील ऐतिहासिक विजयानंतर आज चिमूर येथे भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांसह मंडल प्रमुख, निरीक्षक,प्रभारी प्रमुख तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधत सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच चिमूर नगर परिषद व भिसी नगर पंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले.
जनतेने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत शहरातील सर्व घटकांचा समावेशक विकास करण्यास प्राधान्य द्यावे,असे आवर्जून आमदार महोदयांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांना सांगितले.
जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असून नवनिर्वाचित सदस्यांनी ती पार पाडली पाहिजे.त्यामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल,असा ठाम विश्वास आमदारांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत चिमूर विधानसभा क्षेत्रात चिमूर नगर परिषदेत नगराध्यक्षांसह १४ नगरसेवकांचा,भिसी नगर पंचायतमध्ये नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांचा तसेच नागभीड नगर परिषदेत ६ नगरसेवकांचा विजय झाला आहे.
हा विजय भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक व कष्टकरी कार्यकर्त्यांचा आहे.अहोरात्र मेहनत करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे हे फलित आहे.
सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपाच्या झेंड्याखाली विजयी झाल्याबद्दल चिमुर व भिसी येथील भाजपाचे अभिनंदन करण्यात आले.तसेच या विजयामागे ठामपणे उभे राहिलेल्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
हा विजय म्हणजे चिमुर व भिसी नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर दाखविलेला विश्वास आहे.या विश्वासाला पात्र ठरत क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली असून शहराच्या विकासासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत असे आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले.
यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते,जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,तालुका अध्यक्ष,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,नगराध्यक्ष,नगरसेवक,मंडल अध्यक्ष,प्रभारी प्रमुख,निरीक्षक,विविध आघाडीचे अध्यक्ष तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



