Home देशविदेश धर्म,धर्माचरण,धार्मिक कार्य…

धर्म,धर्माचरण,धार्मिक कार्य…

            “धर्म आणि अधर्म” एक संकल्पना माणसांनी शोधून काढली. माणसांचे वागणे बोलणे आणि व्यवहार हे एकमेकास अडचणीचे आणि घातक ठरले होते, यावर उपाय म्हणून माणसाला धर्म ही संकल्पना सुचली असावी. धर्म याचा अर्थ धारणा होय. विश्वास श्रद्धा आस्था. अर्थात कोणत्या गोष्टी चांगल्या आणि वाईट, श्रद्धा ठेवावी किंवा विश्वास ठेवावा किंवा मान्यता द्यावी, अशा कोणत्या गोष्टी किंवा कोणते विचार किंवा कोणत्या कल्पना संकल्पना, याचा निर्णय म्हणजे धर्म होय. अर्थात सर्वांच्या उपयोगी आणि एकमेकांना त्रासदायक न होणाऱ्या गोष्टी त्या स्वीकाराच्या, त्यास मान्यता द्यायची आणि एकमेकांना त्रास देणाऱ्या गोष्टीचा अधिकार करायचा किंवा त्यांचा त्याग करायचा, म्हणजे धर्म होय, मुळात ही धर्माची खरी व्याख्या आहे. याबरोबरच माणसातील सदगुणांना वाव द्यायचा त्यांची वाढ करायची आणि माणसातील दुर्गुण मारून टाकावे यासाठी प्रयत्न करणे म्हणजे धर्म होय. धर्माच्या मुळाशी हे विचार आहेत.

       धर्म म्हणजे प्रज्ञासील करुणा सत्य न्याय नीती दया क्षमा शांती स्वातंत्र्य बंधुता समता बुद्धी तर्क विज्ञान. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, म्हणजेच धर्म होय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणजेच धर्म होय. विश्वचि हे माझे घर म्हणजेच धर्म होय. विश्वशांती विश्वबंधुत्व म्हणजेच धर्म होय, जय जगत हा प्रत्येक मनुष्याचा नारा असला पाहिजे. यालाच मानवता धर्म असे म्हणतात. माणसाने माणसासाठी माणसासारखे वागणे माणसाने माणसाला माणुसकीची वागणूक देणे म्हणजेच मानवता धर्म होय. या विरोधीचे वर्तन म्हणजे अधर्म होय. अनेक देव अनेक धर्म अनेक जाती म्हणजेच अधर्म होय. धर्माच्या ह्या व्याख्यानुसार वर्तन करणे म्हणजे धर्माचरण करणे होय. सदगुणांचे बीज रोपण करणे ते रुजविणे त्याची वाढ करणे त्याचे वृक्ष तयार करणे आणि त्या वृक्षाच्या सावली खाली विश्रांती घेणे म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे अमृत वृक्ष आणि अधर्म म्हणजेच विषवृक्ष होय. विषमतेचा विषवृक्ष आणि समतेचा अमृत वृक्ष होय.

      विविध धर्म आणि त्या धर्मांचे आचरण म्हणजेच संस्कृती, ही विविध संस्कृती म्हणजेच धर्मांचे कर्मकांड होय, उदाहरणार्थ अनेक ईश्वर आणि त्या अनेक विश्वरांच्या अनेक प्रार्थना, आराधना पूजा पाठ पोथी पुराण, तीर्थक्षेत्र आणि तीर्थाटन, विविध पोशाख पद्धती तसेच विविध खानपान, तसेच विविध केशरचना, रूढी परंपरा चालीरीती म्हणजेच विविध संस्कृती, म्हणजेच धर्म संस्कृती आणि त्या धर्म संस्कृतीचे बंधन म्हणजेच पारतंत्र्य होय, गुलामी होय, स्वातंत्र्य या संकल्पना च्या विरोधी वर्तन होय. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या धर्मामध्ये स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि न्याय नाही तो धर्मच नव्हे. खानपान वेशभूषा किस भूषा आणि प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार जगण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच खरे स्वातंत्र्य होय, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आचरण स्वातंत्र्य प्रत्येकाला असले पाहिजे, विशिष्ट संस्कृती निर्माण करायची आणि त्या संस्कृतीचे बंधन लोकांवर लादणे म्हणजेच स्वातंत्र्य नसून ती एक प्रकारची सांस्कृतिक गुलामीच होय, धर्माच्या नावाने लावलेली सांस्कृतिक गुलामी होय.

          ज्या रूढी परंपरा आणि चालीरीतीतून माणसांची हिंसा होते किंवा त्यांचे शारीरिक आणि आर्थिक आणि मानसिक शोषण केल्या जाते अशा चालीरीती अंधश्रद्धा रूढी परंपरा या धार्मिक असल्या तरी त्या चुकीच्या आहेत, त्या अंधश्रद्धाच ठरतात, त्या डोळस श्रद्धा नव्हेत. विश्वास आस्था श्रद्धा ह्या विचारावर हव्या कर्मकांडावर नव्हे, ज्या कर्मकांडातून अंधश्रद्धा निर्माण होतात असे कर्मकांड करणे म्हणजेच अधर्म होय. कर्मकांड म्हणजे धर्माचरण नव्हे. सदगुणांचे वर्तन आणि दुर्गुणाचे निवारण आणि त्यासाठी केलेले कर्म म्हणजे धर्माचरण होय. माणसाला प्रगतीच्या मार्गावर ठेवणारे कर्म म्हणजेच धर्माचरण होय, आणि माणसाला अधोगतीच्या मार्गावर ठेवणे म्हणजेच धर्मविरोधी कर्म होय. अंधश्रद्धा या माणसाला अधोगतीसच नेऊन ठेवतात. डोळस श्रद्धा या माणसाला पुढे जाण्यास मदत करतात.

        विषमतेचे व्यवहार आणि विषमतेची व्यवस्था आणि ती टिकवून ठेवण्यासाठी केलेले सर्व कर्म म्हणजेच अधर्म होय. याउलट समतेचे विचार आणि समतेचे व्यवस्था आणि समतेसाठी केलेले प्रयत्न म्हणजेच धर्म होय.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 24 डिसेंबर 2025, फोन : 9420912209