Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ५ मध्ये भाजपचे संतोष रासकर – खुशी...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ५ मध्ये भाजपचे संतोष रासकर – खुशी बोरुंदिया यांचा विकासकेंद्रीत प्रचार…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :– नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपचे उमेदवार संतोष रासकर आणि खुशी बोरुंदिया यांनी विकासकेंद्रीत आश्वासनांसह प्रचाराला वेग दिला असून नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. प्रभागातील मुलभूत पायाभूत सुविधांवर भर देत जनसंपर्काच्या माध्यमातून या पॅनेलने स्वतःची छाप उमटवली आहे.

मूलभूत सुविधांवर भर…

        प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांच्या उन्नतीवर केंद्रित आराखडा उमेदवारांनी मांडला आहे. संतोष रासकर यांनी प्रभागातील विविध भागांना भेट देत प्रलंबित कामांची माहिती घेतली आणि ती प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

        महिलांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य उपक्रम आणि बचतगटांना सहाय्य यांसारखे उपक्रम राबविण्याचा मानस खुशी बोरुंदिया यांनी व्यक्त केला.

जनसंपर्काला प्रतिसाद…

        प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांनी रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थेबाबत अनेक मागण्या मांडल्या. या समस्यांचे व्यवस्थित निराकरण करण्याची ग्वाही दोन्ही उमेदवारांनी दिली आहे. युवकांपासून महिला मतदारांपर्यंत विविध घटकांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लढतीचे स्वरूप…

        प्रभाग क्र.५ मध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत आहे. दोन्ही पॅनेल प्रचारात सक्रिय असून मतदारांचा कल कोणत्या बाजूला झुकतो, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजप उमेदवारांची वाढती सक्रियता आणि त्यांच्या प्रचाराचा व्याप प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे.

नागरिकांच्या अपेक्षा…

        स्वच्छता, सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि सुटसुटीत वाहतूक व्यवस्थेकडे प्रभागातील नागरिकांचा कल आहे. या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी सादर केलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी कशी होईल, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.