Home Maharashtra “वारी ही समतेची चळवळ; तिचा वारसा जपूया” — काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

“वारी ही समतेची चळवळ; तिचा वारसा जपूया” — काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पालखी सोहळ्यात सहभाग

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

 पुणे — “अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव नाही, वाढती बेरोजगारी — या साऱ्या संकटांनी बळीराजा आणि तरुणवर्ग हवालदिल झाला आहे. सावळ्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे की, या दुःखातून महाराष्ट्राची सुटका होवो, महिलांवरील अत्याचार थांबोत आणि ‘विश्वात्मके देवे’ या भावनेचे मूर्त रूप घडो,” अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वारकऱ्यांच्या भावनिक वाटचालीत आपली एकनिष्ठता व्यक्त केली.

       पालखी सोहळ्यात सपकाळ यांनी दिंडी क्रमांक २८२ मधून सहभाग घेतला. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत येथून वरवंड गावापर्यंत ते पायी चालले. या प्रवासात त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले.

        “वारी म्हणजे केवळ अध्यात्मिक यात्रा नसून ती सामाजिक समतेची सजीव चळवळ आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी पुढे सांगितले, “वारकरी संप्रदायाने देशाला समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची शिकवण दिली आहे. याच तत्वांवर भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची आणि महाराष्ट्र धर्माच्या स्थापनेची पायाभरणी झाली.”

         वारकरी चळवळीतील सहभाग हा केवळ श्रद्धेचा नव्हे, तर समाजप्रबोधनाचा भाग असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले, “संत साहित्य, वारी आणि वारकरी संप्रदाय हा फक्त भजनाचा नव्हे तर जनजागृतीचा महत्त्वाचा भाग आहे. काँग्रेस पक्ष या विचारसरणीशी बांधिल आहे. समाजवाद, बंधुत्व आणि लोककल्याणाचे मूल्य आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो.”

         वारीत सहभागासोबतच त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिलांचे प्रश्नही समजून घेतले. पदयात्रेदरम्यान त्यांनी अनेक वयोवृद्ध वारकरी, महिला दिंड्या आणि तरुण मंडळांशी सुसंवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.