दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे, — “सेवा परमोधर्म आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ती पोहोचवण्याचे कार्य श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या माध्यमातून प्रभावीपणे घडावे,” असे मत केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांनी आपल्या मातोश्री स्व. सरस्वती कराड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री सरस्वती कराड हॉस्पिटल (SSKH) ची उभारणी केली. या रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यसभा खासदार डॉ.मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, आणि रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तुषार खाचणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.कराड हे होते.
चंद्रकांत पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले, “कोरोनासारख्या संकटात आरोग्यसेवा किती महत्त्वाची आहे, हे आपण पाहिले. नागपूरमधील आरोग्य सुविधांच्या धर्तीवर अशीच सेवा पुण्यातही मिळावी, ही अपेक्षा आहे.”
गिरीश महाजन यांनीही शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती देताना या रुग्णालयाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ.कराड म्हणाले, “सेवाभाव, समर्पण व त्याग या तत्त्वांवर आधारित हे रुग्णालय म्हणजे आईप्रती अर्पण केलेली एक श्रद्धांजली आहे.” कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वैशाली कोरडे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. तुषार खाचणे यांनी मानले.
विशेष महत्त्व
हे रुग्णालय सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले असून, पुण्यातील आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाची भर ठरणार आहे.



