दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे – संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बुधवार (दि. २५) रोजी खंडोबाच्या जेजुरी नगरीतून महर्षी वाल्मिकी ऋषींच्या पावन स्थळी वाल्हे गावाकडे प्रस्थान करणार असून, या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण वाल्हे नगरी भक्तिभावाने सज्ज झाली आहे.
आद्यरामायणकार वाल्मिकी ऋषींच्या पवित्र भूमीत येणाऱ्या माऊलींच्या पालखीचे स्वागत भव्य व भाविक वातावरणात होणार असून, यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट पालखी तळावर भेट देत पाहणी केली. तपासणीनंतर विविध सूचना देण्यात आल्या असून त्या अंमलात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ३० विहिरी व ७ सार्वजनिक टाक्यांचे जलशुद्धीकरण करण्यात आले आहे. तसेच ३२ हॉटेलांची तपासणी करून स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पर्यवेक्षिका संजीवनी दरे आणि आरोग्य सहाय्यक रवींद्र मोहिते यांनी दिली.
वारकऱ्यांसाठी अन्नदान, फराळ, चहा वाटपाच्या सेवेसह पिण्याचे व अंघोळीचे पाणी, आरोग्य सुविधा, विद्युतपुरवठा, मोबाईल चार्जिंग, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सोयी पालखी तळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारकऱ्यांची सेवा हीच खरी वारीची शान मानत वाल्हेकर भाविक बांधव या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागतासाठी एकदिलाने उभे आहेत.



