दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
जेजुरी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सासवडहून पुढे प्रस्थान करत सायंकाळी सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान मल्हारनगरी जेजुरीत पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच जेजुरी नगरीत भक्तांची मोठी गर्दी जमू लागली असून, गडावर भक्तीमय वातावरण पसरले आहे.
खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गड चढत असून, गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विठ्ठलाची देखणी प्रतिकृती उभारण्यात आली असून, ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात आणि “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. वारकरी मोठ्या संख्येने पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असून, त्यांच्यात उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
जेजुरीत पावसाच्या सरींचे आगमनही वातावरण अधिकच प्रसन्न करणारे ठरत आहे. पालखीच्या स्वागतानंतर गडावर रथावरून पवित्र भंडाऱ्याची उधळण होणार आहे. ‘याचि देही याची डोळा’ असा हा अलौकिक क्षण वारकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने भक्कम बंदोबस्त आणि सोयीसुविधांची जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.



