बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. जीवनाचा मूलाधार आणि मानवसभ्यतेची जीवनरेखा असलेले हे जल स्वच्छ व संरक्षित राहिले, तर केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवसमाजाचे एकूण आरोग्य आणि संतुलन अधिक सक्षम होते. याच विचाराला कृतीरूप देत नैसर्गिक जलस्रोत, नद्या, तलाव, सरोवरे आणि समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी उभारलेला व्यापक उपक्रम आज जन-माणसासाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. ही चळवळ केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून जागरूकता, जबाबदारी आणि सामूहिक सहभागाचा ठोस संदेश देणारी ठरली आहे.
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज (रविवारी ता. 22) देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी यशस्वीरीत्या पार पडले. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला.
या स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत अंतर्गत बारामती येथील कऱ्हा नदी पात्र परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या नीरा नरसिंगपूर शाखेसह इंदापूर, पळसदेव, अंथूर्णे इत्यादी शाखेतील पाचशेहून अधिक अनुयायांनी सहभाग घेतला असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
या अभियानास निरा नरसिंगपूर चे सरपंच नितीन सरवदे, लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व गावचे पोलीस पाटील अभय कुमार पाटील व त्यांचे सहकारी यांनी संत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी श्री. सरवदे म्हणाले हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता. या माध्यमातून जनमानसात कर्तव्यभाव आणि जागरूकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले
संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने, बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत ‘प्रोजेक्ट अमृत’ हा उपक्रम राबविण्यात आला.
संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी अमृतमय विचार व्यक्त करताना सांगितले की, बाबा जींच्या शिकवणी या केवळ स्मरण करायच्या नसून त्या जीवनात अंगीकारण्यासाठी आहेत. खरी श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे, तर कृतीतून अर्पण केली जाते. आपण त्यांच्या अनुयायी असल्याचा दावा करीत असू, तर प्रेम, सेवा, करुणा आणि समदृष्टी यांसारख्या मूल्यांचा स्वीकार आपल्या दैनंदिन जीवनात झाला आहे का, याचे आत्मपरीक्षण आवश्यक असल्याचे सांगितले.
स्वच्छता अभियान संपन्न झालेवर त्याच ठिकाणी विशाल सत्संगचेही आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बाहेरील स्वच्छतेबरोबर मनाच्या आंतरिक शुध्दतेचा संदेश देण्यात आला. सदर स्वच्छता अभियान महादेव शिंदे जी. शिवाजी अवचर जी, प्रकाश काळे जी, यांनी सहभाग घेतला.



