शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
अवकाळी वादळ,वारा व पावसामुळे चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील,मौजा शंकरपूर परिसरातील शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे.यामुळे शेतमालाच्या झालेल्या पिक नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शंकरपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी निवेदनाद्वारे अवगत करून दिले की,मौजा शंकरपूर (ता. चिमूर जि. चंद्रपूर) परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळ-जोरदार वारा व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या व वाढीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत.
यामुळे सदर बाबी संदर्भात खालीलप्रमाणे मुद्देसूद निवेदन सादर करीत आहे….
१) अवकाळी पावसामुळे गहू हरभरा,कापूस,भाजीपाला व इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
२) अनेक शेतांमध्ये पिके आडवी झाली असून काढणी योग्य पिके पाण्यात भिजून खाब झाली आहेत.
३) शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व कर्ज काढून शेती केली असताना अचानक झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
४) काही ठिकाणी फळबाग व सिंचन सुविधा देखील बाधित झाल्या आहेत.
५) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे अत्यावश्यक आहे,अन्यथा पुढील हंगामासाठी शेती करणे कठीण होईल.
संबंधित तलाठी,कृषी सहाय्यक व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ शेत पाहणी करून पंचनामे करण्यात यावे व शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून नुकसानभरपाई लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात यावा.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत व कर्जमाफीचा विचार करण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना शंकरपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी विनंती सुध्दा त्यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना केली आहे.
याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके यांना निवेदन दिले आहे.



