Home Social आज चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ… —...

आज चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ… — विधी व न्याय राज्यमंत्री ना.ऍड.आशिष जैस्वाल यांची विशेष उपस्थिती…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने चिमूर तालुक्यातील बुद्ध विहारांसाठी चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त बुद्ध विहारांचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री ऍड.आशिष जैस्वाल यांचे विशेष उपस्थितीत आज 25 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.

        चक्रवर्ती सम्राट अशोकांनी आपल्या राजवटीत ८४ हजार स्तूपांची निर्मिती केली.या स्तूपांतून समता,बंधुता,प्रेम साऱ्या जगभर प्रसारित करण्याचे कार्य त्याकाळी झाले.आजही अनेक बुद्धविहारांतून सामाजिक समतेचा संदेश दिल्या जातो.बुद्धविहारे ही भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी धम्म चळवळीची केंद्रे व्हावीत,या विहारांमधून सामाजिक चळवळीचे कार्य सातत्याने होत रहावे या उद्देश्याने चिमूर तालुक्यातील बुद्धविहारांकरिता चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचे आयोजन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेकडून करण्यात आले.

          या स्पर्धेकरिता बुद्धविहार समित्यांकडून अर्ज मागविण्यात आले. तालुक्यातील बुद्धविहारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त विहारांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चिमूर येथील मिलन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.बुद्ध विहारात विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविणाऱ्या बुद्धविहारांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत.

        या समारंभाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे न्याय व विधी,अर्थ,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,कामगार राज्यमंत्री ना.ऍड.आशिष जैस्वाल उपस्थित राहणार आहेत.

         समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार डॉ.नितीन राऊत,माजी मंत्री आमदार इंजि.राजकुमार बडोले, आमदार कीर्तिकुमार भांगडिया,आमदार संजय मेश्राम,नगराध्यक्षा गीता लिंगायत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील,सचिव सुरेश डांगे,सदस्य हरी मेश्राम,रामदास कामडी,विरेंद्र बन्सोड,सुधाकर गणवीर,प्रियानंद गेडाम,नितीन पाटील यांनी दिली आहे.

       बुध्दगया महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी महाराष्ट्र राज्याचे न्याय व विधीमंत्री ना.अॅड. आशिष जैस्वाल यांना चिमूर तालुक्यातील उपासक उपासिकांकडून निवेदन देण्यात येणार आहे.हे निवेदन देण्याकरीता मोठ्या संख्येने उपस्थित होऊन ऐतिहासिक लढ्याचा भागिदार होण्याची संधी चिमूरकरांना प्राप्त झाली आहे.

          महाराष्ट्र शासनाला दिलेल्या निवेदनाचा प्रस्ताव बिहार सरकारला पाठवून बुध्दगया महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्यास चिमूर क्रांतीभूमीचा निश्चितच या माध्यमातून हातभार लागणार आहे.या समारंभाला चिमूर तालुक्यातील उपासक उपासिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. भूपेश पाटील यांनी केले आहे.