दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ हा शहरातील सर्वाधिक चर्चेतला प्रभाग ठरत असून येथे दोन माजी उपनगराध्यक्षांच्या घराण्यांची पुढील पिढी निवडणूकीसाठी सज्ज झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिल्याने या प्रभागातील लढत अधिकच रंगतदार बनली आहे.
खुशी बोरुंदिया विरुद्ध कांचन कुऱ्हाडे…
माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांची कन्या खुशी सागर बोरुंदिया या भाजपकडून मैदानात असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांचन कुऱ्हाडे यांचे आव्हान आहे. दोन्ही महिला उमेदवार सामाजिक कार्यात सक्रिय असून प्रभागातील महिलांमध्ये या लढतीबाबत विशेष उत्सुकता दिसत आहे.
संतोष रासकर विरुद्ध रोहन कुऱ्हाडे…
दुसऱ्या जागेवर भाजपने माजी नगरसेवक संदीप रासकर यांचे बंधू संतोष रासकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहन कुऱ्हाडे यांच्यात तितकाच काट्याचा संघर्ष अपेक्षित आहे. रोहन कुऱ्हाडे हे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे यांचे पुत्र असल्याने प्रभागात कुऱ्हाडे घराण्याचा प्रभाव किती पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
घराण्यांचा प्रभाव आणि तरुण उमेदवारांचा आत्मविश्वास…
प्रभाग क्रमांक ५ मध्ये बोरुंदिया आणि कुऱ्हाडे या दोन कुटुंबांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. बोरुंदिया घराणे संघटन व जनसंपर्कासाठी ओळखले जाते, तर कुऱ्हाडे घराणे विकासकामांतील सातत्यपूर्ण सहभागामुळे प्रसिद्ध आहे. यंदा या दोन्ही घराण्यांचे वारस स्वतः मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी चळवळ जाणवते.
तरुणांचा वाढता सहभाग…
खुशी बोरुंदिया आणि रोहन कुऱ्हाडे या दोघांच्या तरुणाईचा ऊर्जावान प्रचार सोशल मीडियापासून गल्लीसभांपर्यंत पाहायला मिळत आहे. युवा मतदारांचा प्रतिसाद लक्षणीय असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
निकालाकडे सर्वांचे लक्ष…
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची या प्रभागातील संघटना सक्षम असल्याने लढत चुरशीची ठरणार आहे. बोरुंदिया आणि कुऱ्हाडे या घराण्यांची प्रतिष्ठा, तर उमेदवारांची प्रतिमा आणि विकासाचे आश्वासन—या सर्व गोष्टींची एकत्रित परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. प्रभाग क्र.५ मध्ये वारसा की बदल, कोणत्या दिशेने मतदार कल दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



