दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये राजकीय तापमान चांगलेच चढू लागले असून येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना रंगणार आहे. तर एका पॅनेलमध्ये शिवसेनाही रिंगणात उतरल्याने लढतीत आणखी रंगत वाढली आहे.
गोविंद उर्फ सागर कुऱ्हाडे यांना योगेश कुऱ्हाडेंचे आव्हान
भाजपकडून अपेक्षेप्रमाणे गोविंद उर्फ सागर कुऱ्हाडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रभागातील चांगली संघटना, जय गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा आणि स्थानिकांशी असलेला थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यांना थेट आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून योगेश कुऱ्हाडे मैदानात उतरले आहेत.
या दोन्ही उमेदवारांच्या लढतीकडे प्रभागातील नागरिकांचे विशेष लक्ष लागले असून “कुऱ्हाडे विरुद्ध कुऱ्हाडे” अशी हायव्होल्टेज लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
महिला पॅनेलमध्ये त्रिकोणी लढत : कांचन येळवंडे – पुजा कुऱ्हाडे – हिरकनी धुर्वे
प्रभागातील दुसऱ्या जागेसाठी महिला पॅनेलमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे.
भाजप : कांचन येळवंडे
भाजपच्या कांचन येळवंडे या भाजपचे माजी शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी आहे. येळवंडे यांचा घराघरात संपर्क आणि संघटन कौशल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. भाजपच्या मजबूत गोटाचा त्यांना फायदा होऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस : पुजा अनिकेत कुऱ्हाडे
राष्ट्रवादीकडून पुजा कुऱ्हाडे या मैदानात शांत स्वभाव, तरुणाईचा पाठिंबा आणि सामाजिक कामाची पार्श्वभूमी, कुऱ्हाडे घराण्याचा प्रभाव या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो
शिवसेना : हिरकनी धुर्वे
शिवसेनेकडून हिरकनी धुर्वे या रिंगणात उतरल्याने लढत त्रिकोणी होणार हे निश्चित आहे. त्यांना स्थानिक समस्यांवर थेट आवाज उठवणाऱ्या म्हणून ओळख असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या एकदिलाने पाठिंब्याची अपेक्षा आहे.
ही तिन्ही उमेदवार महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करून जोमात प्रचार करत असून प्रभाग क्रमांक ४ मध्ये त्रिकोणी लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
मतदारांच्या अपेक्षा…
प्रभागात पाणीपुरवठा, रस्त्यांची डांबरीकरणे, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता आणि वाहतूक कोंडी ही मुख्य प्रश्न आहेत. चार वर्षांपासून रखडलेल्या कामांमुळे मतदार आता ठोस काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देणार अशी चर्चा आहे.
निष्कर्ष…
प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची सरळ लढत आणि महिला पॅनेलमध्ये त्रिकोणी सामना अशी निवडणूक पूर्णपणे चुरशीची झाली आहे. प्रचाराचा जोर वाढत असून नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



