जखमी मादी काळवीटला वाचविण्याचे ग्रीनफ्रेंड्स व वनविभागाकडुन शर्थीचे प्रयत्न…  — पण अखेर निसर्गप्रेमींचे शर्थीचे प्रयत्न ठरले निष्फळ… — गडेगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावरील घटना…

 

चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी 

 लाखनी:-

       येथून 5 किमी अंतरावरील गडेगाव जवळच्या सातसितारा बार जवळील राष्ट्रीय महामार्गावर रात्री 9 वाजताचया सुमारास एक जखमी हरीण पडून असल्याची सूचना योगेश बोपचे याने ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचा निसर्गमित्र पंकज भिवगडे याला दिली.निसर्गाच्या सेवेत सदैव तत्पर असणारा पंकज भिवगडे याने सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी पोहोचताच ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना माहिती दिली की चितळ नसून मादी काळवीट( इंग्रजी नाव ब्लॅक बग)आहे असे सांगितले.त्यांनी तात्काळ लाखनी वनविभागाचे कर्मचारी बिटरक्षक कृष्णा सानप व राऊंड ऑफिसर रोहिणी शहारे यांना कल्पना दिली.वनकर्मचारी येईपर्यंत ग्रीनफ्रेंड्सचे वन्यजीव रेस्क्यूर विवेक बावनकुळे, मनीष बावनकुळे,मयुर गायधने,नितीन निर्वाण, मोहनिश बावनकुळे,हेमंत निंबेकर यांनी व त्याच परिसरातील तरुण युवकांनी

 जखमी काळवीटची सुश्रुषा केली. तासाभरानंतर वनकर्मचारी सानप व शहारे मॅडम पोहचल्यावर गाडीत मांडून गडेगाव डेपो येथील वनविभाग कार्यालयात रात्री नेण्यात आले.परंतु तीव्र रक्तस्राव व आणि अपघाताच्या शॉकने ते काळवीट काहीवेळाने दगावले. अशारीतीने रात्रीच्या अंधारात दिड तासापासून ग्रीनफ्रेंड्सच्या वाइल्ड लाईफ रेस्क्यूरचे काळविटाला जीवदान देण्यासाठी चाललेली धडपळ अखेर निष्फळ ठरली.दोनचाकी वाहनांच्या किंवा लहान चारचाकी वाहनांच्या वेगाने रस्त्याच्या दुभाजकाजवळ जात असलेल्या या मादी काळविटाला वेगात धडक दिली असावी त्यामुळेच ते दगावले असावे असा सर्वांचा कयास आहे. पंचनाम्यानंतर वनविभाग गडेगाव डेपोच्या जंगल भागात या मादी काळवीटचे दफन वनविभागाकडून करण्यात आले.सभोवताली जंगल असल्याने तसेच पवनी-उमरेड करांडला अभयारण्यात अनेक वन्यजीव प्राण्यांचा भ्रमणमार्ग याक्षेत्रात जात असल्याने याच भागात विविधठिकाणी वन्यजीवांना सुरक्षित भ्रमंती करण्यासाठी महामार्गावर सुरक्षित पास मार्ग करावे तसेच इतरही उपाययोजना वनविभागाने करावे अशी मागणी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने याप्रसंगी केली आहे.