Home Vidarbha “घामाच्या दाम”साठी सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन, मुख्याधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी…...

“घामाच्या दाम”साठी सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन, मुख्याधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी… — गावातील कचरा संकलन थांबले,नागरिकांचा आक्रोश…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          मागील दोन महिन्या पासुन (फेब्रुवारी व मार्च २०२६) नगर पंचायत प्रशासनाने सफाई कामगार बचत गटाच्या खात्यात पैसे न जमा केल्याने सफाई कर्मचारी यांचे पगार थकित झाले आहे. त्यामूळे कुरखेडा नगरपंचायतातील सर्व सफाई कर्मचारी यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

          नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून सफाई कामगार महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. “घामाचे दाम द्या, काम घ्या”, “मेहनतीचे पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू”, “मुख्याधिकारी जागे व्हा” अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.

          दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन देऊन ७ दिवसांत रक्कम जमा करण्याची मागणी केली होती. मात्र, आज १३ दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.

          एक सफाई कर्मचारी म्हणाली,
“आम्ही रोज सकाळी ५ वाजेपासून रात्रंदिवस शहर स्वच्छ ठेवतो. पण आमच्या कुटुंबाची दोन वेळची रोटीही पोटात पडत नाही. दोन महिन्यांची रक्कम अडकल्या मुळे आमचे वांधे झाले आहे. आता आम्ही काम बंद ठेवणार आहोत. पैसे मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील.”

         सफाई कामगार महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांनी सांगितले की, “आम्ही वारंवार विनंती केली, तरीही दखल घेतली गेली नाही. आता लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या हक्कासाठी लढू. प्रशासनाने तात्काळ निधी मंजूर करावा.”

          सद्यस्थितीत नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे.जिथे तिथे कचरा ढीग जमा दिसत आहेत.कचरा उचल न झाल्यास दुर्गंधी पसरू शकते.ते नागरिकांच्या आरोग्यस घातक ठरू शकते.नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

कोट…

         नगर पंचायत स्वच्छता सभापती सागर निरंकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लवकरच प्रशासन सोबत बैठकीचे आयोजन करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.