Home Maharashtra लाडक्या बहिणींच्या पोस्ट खात्याच्या ई-केवायसीची मुदत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांना दिले उपसरपंच अशोक चौधरी...

लाडक्या बहिणींच्या पोस्ट खात्याच्या ई-केवायसीची मुदत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांना दिले उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदन..‌

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी..‌.

           बऱ्याच लाडक्या बहिणींच्या पोस्ट खात्यांची ई-केवायसीची होणे बाकी असल्याने,मुदतवाढ देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणविस यांना चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील प्रशासक उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या द्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

        निवेदनात म्हटले आहे की,चिमूर तालुक्यातील पोस्ट खातेदार ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील लाभार्थी महिलांचे अनुदान केवायसी अभावी रखडले असल्याने ई-केवायसीसाठी मुदतवाढ देऊन प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशोक चौधरी यांनी केली आहे.

          चिमूर तालुक्यातील पोस्ट कार्यालयामध्ये खाती असलेल्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील हजारो लाभार्थी महिलांना दरमहा मिळणारे रुपये १५००/- चे अनुदान मागील दोन महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.

         सदर बाबत संबंधित महिलांनी पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधला असता,पोस्टमास्तरांकडून “पोस्ट खात्याची केवायसी करण्याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत व केवायसी आवश्यक नाही” असे सांगण्यात आले.

          मात्र,शासन स्तरावर ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली असल्याने,निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे या लाभार्थी महिलांचे अनुदान प्रलंबित राहिले आहे.

       तसेच,तालुक्यातील अनेक महिला उपजीविकेसाठी तेलंगणा राज्यात मजुरीसाठी स्थलांतरित झालेल्या असल्यामुळे त्या वेळेत ई-केवायसी करू शकल्या नाहीत.परिणामी,त्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

         सदर लाभार्थी महिला अनुदान मिळविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वारंवार चकरा मारत असूनही त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. 

       यामुळे त्यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.या अनुदानावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने,अनुदान रखडल्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्च,औषधोपचार तसेच मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे.

         ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून संबंधित विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे सामान्य व गरजू महिलांवर अन्याय होत असल्याचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले आहे.

          त्यांनी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की,‘लाडक्या बहिणी’ योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी तथा पोस्ट खातेदार महिलांसाठी ई-केवायसी करण्यासाठी विशेष मुदतवाढ जाहीर करण्यात यावी.तद्वतच मागील दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे म्हटले आहे की,आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष घालून संबंधित महिलांना न्याय द्याल.