दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “इंद्रायणी ही केवळ नदी नसून संतपरंपरेची आणि वारकरी भावविश्वाची साक्षीदार आहे. तिचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ आहे,” असा ठाम इशारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी दिला.
सात मावळे संवर्धन संस्था, आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंद्रायणी स्वच्छ मोहीम’ तसेच ‘चला इंद्रायणीच्या भेटीला’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. नदीकाठ स्वच्छता, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
महापौर लांडगे आपल्या मनोगतात म्हणाले, “इंद्रायणी ही आपली माता आहे. तिच्या प्रवाहात औद्योगिक केमिकल्स, सांडपाणी किंवा सिव्हेज सोडणे म्हणजे आपल्या संस्कृतीवर आघात आहे. अशा प्रकारांना कुठलाही पाठींबा दिला जाणार नाही. संबंधित उद्योग, कंपन्या आणि सोसायट्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.” तसेच PMRDA अंतर्गत येणाऱ्या घटकांबाबतही समन्वयाने कारवाई केली जाईल व लवकरच आढावा बैठक घेऊन ठोस निर्णय जाहीर केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे पाटील यांनीही इंद्रायणी स्वच्छतेसाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. “नदी संवर्धन ही दीर्घकालीन प्रक्रिया असून जन सहभागाशिवाय ती शक्य नाही,” असे ते म्हणाले.
या उपक्रमात गटनेते सचिन गिलबिले, उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे पाटील, सागर कुऱ्हाडे पाटील, गोविंदा कुऱ्हाडे पाटील, अनिकेत तापकीर, सात मावळे संवर्धन संस्थेचे अध्यक्ष हेमंत कुंभार, मंदिर समिती अध्यक्ष अथर्व मारणे, गड समिती अध्यक्ष तन्मय मोहोळ, संस्था व समिती प्रमुख सर्वेशजी भोसले, शैक्षणिक क्षेत्र अध्यक्ष करणजी पड्यार, सामाजिक क्षेत्र अध्यक्ष लक्ष्मणजी साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



