बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
गोंदी तालुका इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला.
संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या हस्ते. गाथा पूजन, विना पूजन, झेंडा पूजन, टाळ व मृदुंग पूजन ,करून सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री गुरु सोहम महाराज देहुकर सह अनेक वारकरी भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. माऊली महाराज झोळ (वाशिंबे) यांच्या कीर्तन सेवेने भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वेदमंत्रांच्या गजरात गाथा पारायणाला प्रारंभ करण्यात आला. दिवसभर हरिनामाच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला. तर संध्याकाळी झालेल्या कीर्तन सेवेवेळी माऊली महाराज झोळ यांनी अभंग, गाथा आणि हरिनाम महात्म्य यावर प्रभावी निरूपण केले. त्यांच्या तेजस्वी वाणीतून समाज प्रबोधनाचा संदेश देताना नामस्मरणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
कीर्तना दरम्यान टाळ-मृदुंगाच्या गजरात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. परिसरातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक, भाविक भक्त, विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष,सह सर्व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमा अगोदर व नंतरही आलेल्या सर्वांसाठी गोंदी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते.
या अखंड हरिनाम गाथा पारायण सोहळ्यामुळे गावात भक्तीभाव आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळा उत्साहात पार पडत आहे.
कार्यक्रमाचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ह.भ.प महेश सुतार हे करीत आहे.



