Home Political सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश…

सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असून, सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे भव्य ‘कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा’ उत्साहात पार पडला. वंचितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांच्या या लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम यांनी यावेळी केले.

          खापरखेडा येथील पंचशील भवन येथे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी वाडी येथील नवनिर्वाचित नगरसेविका शितल नंदागवळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

बौद्धिक आणि राजकीय क्रांतीची गरज…

            मुख्य मार्गदर्शक कुशल मेश्राम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, माईक्रो ओ.बी.सी., आदिवासी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही अस्मितेची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

           सावनेर तालुक्यातील चिंचोली आणि चनकापूर सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत पक्षात अधिकृत प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने शारदा खांडेकर, सविता गजभिये, कांता केवट, आम्रपाली लोखंडे, रत्नमाला येवले, ताराचंद शेंडे, सत्यशील खोब्रागडे, जानरावजी वानखेडे, शेखर येवले, तन्मय नाईक, अरुण देशभ्रतार यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

           या कार्यक्रमाला प्रा. अनिकेत मून, महानंदा राऊत (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी), अनिरुद्ध मडके (जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी), सी.सी. वासे (महासचिव) यांच्यासह विजय बागडे, धनेश्वर ढोके, वैभव येवले, शुभम वाहने आणि तालुक्यातील पदाधिकारी मिलिंद पकिड्डे, सचिन खंडारे, वसंत मडके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गंगाधर पाटील यांनी केले, प्रास्ताविक सी.सी. वासे यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार कविता मेश्राम यांनी मानले.