तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी!”असे सांगत दीन,दुबळे,अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा….

 

       “देवळात जाऊ नका,मूर्तिपूजा करू नका,सावकाराचे कर्ज काढू नका,अडाणी राहू नका, पोथी-पुराणे,मंत्र-तंत्र, देवदेवस्की,चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.”अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या,अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा,अनाथालये,आश्रम,व विद्यालये सुरू करणारे.रंजले-गांजले, दीन-दुबळे,अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. 

           समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.त्यांचे उपदेशही साधे,सोपे असत.

          चोरी करू नका,सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.

         ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत.‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत.आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला.

       ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत,आपले तत्त्वज्ञान पटवून देत.त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे,असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

     असे थोर राष्ट्रसंत’ गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

-: अभिवादक :-

सन्मा. सविताताई सोनावणे

राष्ट्रीय अध्यक्ष –                           

इंडियन सोशल मुव्हमेंट.